22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूर‘मांजरा’च्या शेतक-यांना आणखी १०० रुपये देणार

‘मांजरा’च्या शेतक-यांना आणखी १०० रुपये देणार

लातूर : प्रतिनिधी 
केंद्र शासनाच्या एफआरपी कायदानूसार विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याच्या प्रमाणित साखर उता-यास २५०५ रुपये भाव असताना विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने कारखान्याच्या इतर उपपदार्थांच्या विक्रीतून झालेल्या नफ्यातून ऊस उत्पादक शेतक-यांना पाडव्यापुर्वी प्रति मे. टन २६०० रुपये प्रमाणे ऊस बिलापोटी दिले असून आणखी १०० रुपये देण्याचे कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेचे ऊस उत्पादक शेतक-यांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात स्वागत केले.
तालुक्यातील विलासनगर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना अधिमंडळाची ४० वी सर्वसाधारण सभा दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता लातूर शहरातील कातपूर रोडवरील पार्वती मंगल कार्यालयात कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याप्रसंगी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी उपरोक्त घोषणा केली.  या सभेस प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार धिरज विलासराव देशमुख, साखर महासंघाचे आबासाहेब पाटील, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, ट्वेंन्टीवन शुगरचे  व्हाईस चेअरमन विजय देशमुख, बाजार समितीचे माजी  सभापती ललितभाई शहा, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपती काकडे, यशवंतराव पाटील, गणपतराव बाजूळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकरी म्हणून शेतक-यांच्या अपेक्षा असणे सहाजिक आहे. त्या अपेक्षा पुर्ण करणे हे मांजरा परिवाराचे कर्तव्य आहे, असे नमुद करुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख पुढे म्हणाले, विकासरत्न विलासराव देशमुख, स्व, बब्रुवान काळे यांनी त्या-त्या काळात मांजरा साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतक-यांना सर्वाधिक भाव दिला  आहे. तीच परंपरा आजही कायम सुरु आहे.  मांजरा कारखान्याने नेहमीच नवनवीन प्रयोग केले आहेत. त्याचा फायदा शेक-यांनाच मिळाला आहे. यांत्रिकीकरण हा सुद्धा नवीन प्रयोग आहे. हार्वेस्टींगचा प्रयोग केला त्याला चांगले यश मिळाले. आता कारखान्याची क्षमता वाढविण्यात आली आहे.  त्याचाही फायदा शेतक-यांना होणार आहे, असे नमुद करुन त्यांनी कारखान्याच्या कर्मचा-यांना १६.६५ टक्के बोनस जाहीर केला. विद्यमान सत्ताधा-यांनी महाराष्ट्राचे काय वाटोळे करुन ठेवले हे मी सांगण्याची गरज नाही, असे नमुद करुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, या सत्ताधा-यांमुळे महाराष्ट्र आज प्रत्येक क्षेत्रात  मागे पडत चालला आहे. महाराष्ट्राला गत वैभव मिळवून देण्यासाठी  आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचंड मतांनी विजय करावे, असे आवाहन  केले.
अधिसभेपुढे कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई यांनी विषयांचे वाचन केले. कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे यांनी सुचक म्हणून तर संचालक अशोेक काळे यांनी अनुमोदन दिले. टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना मंजूरी देण्यात आली. प्रारंभी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. समद पटेल, अ‍ॅड. प्रविण पाटील, विद्या पाटील, अनंतराव देशमुख, गोविंद बोराडे, अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, शिवाजीराव कांबळे, अ‍ॅड. श्रीरंग दाताळ, जितेंंद्र स्वामी, हरीराम कुलकर्णी आदी उपस्थित होते. सर्वांचे स्वागत कारखाच्याचे संचालक तात्यासाहेब देशमुख, वसंतराव उफाडे, अशोकराव काळे, व्यंकटराव कदम, सदाशिव कदम, अनिल दरकसे, सुर्यकांत पाटील, सचिन शिंदे, निलकंठ बचाटे, धनराज दाताळ, ज्ञानेश्वर पवार, कैलास पाटील, नवनाथ काळे, शेरखॉ पठाण, शंकरराव बोळंगे, निर्मला चामले, मंगलाबाई पाटील, बाबूराव जाधव, महेंद्रनाथ भादेकर, ज्ञानेश्वर भिसे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी  केले तर कैलास पाटील यांनी आभार मानले.
महाराष्ट्राचा स्वाभीमान पुन्हा मिळवू
भाजपा, शिवसेना(एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) या महायुतीच्या सरकारचे सुत्र गुजरातमधून हलत आहेत. महायुतीने महाराष्ट्राचा स्वाभीमान गहाण ठेवला आहे. बेकारी वाढली आहे. तरुणांची लग्न होत नाहीत. तरुण निराश आहेत. शेतक-यांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. आरोग्य रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधाही उपलब्ध होताना दिसत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी तमाम मतदारांच्या प्रचंड पाठींब्याच्या जोरावर भाजपा महायुतीला गाढून महाराष्ट्राचा स्वाभीमान पुन्हा मिळवेल, असा विश्वास माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना ही संस्था देशाचे नेते विलासराव देशमुख यांनी ४० वर्षांपुर्वी स्थापन केली. चार दशकांपासून आपण दरवर्षी एकत्र येतो. ४० वर्षांत कसलीही कुरबूर नाही, असे उदाहरण कोठेच नाही. हे केवळ पारदर्शक कारभार आणि एकमेकांविषयीच्या विश्वासाच्या नात्याने शक्य होते. या उलट ग्रामसभेमध्ये काय होते याची कल्पना सर्वांना आहे, असे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले, विलासराव देशमुख साहेबांनी समाजाचे हित जोपासले. सारं लातूर माझं कुटूंब, या विचारातून त्यांनी लातूर सुरक्षीत कसे राहिल, प्रगती कसे करेल याचे यशस्वी प्रयत्न केले. तोच विचार जोपासण्याचे काम माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले आहे. ३६५ दिवसांपैकी ३६४ दिवस दिलीपराव देशमुखसाहेब आपल्या सर्वांची काळजी घेणारे नेतृत्व आहे. मांजरा परिवाराने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भापेक्षाही सर्वाधिक भाव दिला आहे.
अनेकांनी साखर कारखाने काढले त्यांना हे जमले नाही. आता काहीजण गुळाचे कारखाने काढत आहेत. खरे तर मांजरा परिवार  आमदार, खासदार निर्माण करणारा परिवार आहे. विलासरावजी देशमुख, दिलीपरावजी देशमुख, जयवंतरावजी आवाळे, अमित देशमुख, वैजनाथराव शिंदे, त्र्यंबक भिसे, धिरज देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांना मांजरा परिवारानेच घडवले आहे. त्यामुळे आगामी काळातही मांजरा परिवाराचे आशिर्वाद कायम राहतील. कारण मांजरा परिवरातील प्रत्येक सदस्य हा मांजरा परिवाराचा ब्रॅण्ड अ‍ॅबेसेडर आहे, असेही ते म्हणाले.
‘मांजराकाठ’चा नाद करायचा नाय
‘मांजराकाठ’चा नाद करायचा नाय, अशी गर्जना करीत लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यावेळी बोलताना म्हणाले, विलासराव देशमुखसाहेबांनी जयवंतराव आवळे यांना कोल्हापूरहून लातूरला आणून लातूरचे खासदार केले. त्या निवडणूकीत लोहा, कंधारच्या ईव्हीएम मशिनींपासून मतमोजणीस सुरुवात झाली. तेव्हा आवळे मायनस चालले होते. त्यावेळी विलासराव देशमुखसाहेबांनी म्हणले होते, थांबा माझा मांजराकाठ सुरु होऊ द्या. मांजराकाठची मतमोजणी सुरु झाली. आवळे खासदार झाले. त्याचीच पुनरावृत्ती २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत झाली आणि मांजराकाठ येऊपर्यंत लोहा, कंधारनेच डॉ. शिवाजी काळगे यांना लीड दिली. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाने हे घडवले. म्हणतात ना बापसे बेटा सवाई. त्यामुळे मांजराकाठचा नाद करायचा नाय, असे म्हणातच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
मांजरा परिवार विकासाच्या स्पर्धेत कधीही एकपाऊस पुढेच असणार, असे नमुद करुन आमदार धिरज देशमुख म्हणाले, गेल्या ४० वर्षांत विलासराव देशमुख मांजरा साखर परिवाराने शेतक-यांच्या हिताचे काम केले आहे. पुढेही ते अविरतपणे सुरुच राहणार आहे. ज्या देशाने जगाला साखर उद्योग दाखवला. ते देश आज मांजरा परिवारात येत आहेत. विलसराव देशमुखसाहेबांनी जगाला दिशा दाखवणारी साखर कारखानदारी आणली. ती दिलीपराव देशमुखसाहेब व अमित देशमुखसाहेब पुढे नेत आहेत. सत्ताा-यांनी चिंचोलीराव परिसरात रेल्वे बोगी कारखाना आणला. एक नाही तीन वेळा कारखान्याचे उद््घाटन केले. परंतू, बोगी काही बाहेर पडली नाही. उलट परदेशी कंपनीला कारखाना दिला. बेरोजगारांना रोजगार नाही, शेतक-यांच्या शेतमालाला भाव नाही, महिला भगिनींना सुरक्षा नाही. त्यामुळे बाप्पा तुम्ही जाताय…. महायुतीचे विघ्न घेऊन जा…  अशी विनंतीही आमदार धिरज देशमुख यांनी श्री गणरायांना केली. गेल्या पाच वर्षांत नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम केले. मी स्वत: मतदारसंघात भरघोष कामे केली आहेत. इतरांच्या कामाचे श्रेय घेण्याचे काही कारण नाही. मतदारांनी मला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मांजरा परिवार शेतक-यांचे आश्रु पुसणारा 
मांजरा परिवाराने कधीही व्यवसायिक दृष्टीकोन बाळगले नाही. शेतक-यांना प्रश्न भेडसावत असताना विलासराव देशमुखसाहेब, दिलीपराव देशमुखसाहेब, अमित देशमुखसाहेब, धिरज देशमुखसाहेब यांच्या माध्यमातून मांजरा पारिवाराने शेतक-यांचे आश्रु पुसले, असे नमुद करुन खासदार डॉ. शिवाजी काळगे पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR