लातूर : प्रतिनिधी
मोबाईलच्या वाढत्या वापराच्या युगात, वाचन संस्कृती दिवसेंदिवस लोप पावत आहे. यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही अपवाद राहिले नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत सर्व शैक्षणिक संकुलात खास उपक्रम राबवण्यात आला आहे. यात सलग १८ तास अभ्यासक्रमाचा उपक्रम राबविण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती निमित्त सलग १८ तास अभ्यासक्रम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येऊन एकूण दहा विविध शैक्षणिक संकुलात हा उपक्रम राबवण्यात आला असून यामध्ये जवळपास १ हजार ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात श्री निळकंठेश्वर विद्यालय निवळी, विलासराव देशमुख विद्यालय सावरगाव, श्री मांजरेकर हनुमान प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिंचोलीराव वाडी, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय पिंपळगाव, श्री गणेशनाथ विद्यालय सारसा, श्री सद्गुरु विद्यालय वांजरखेडा, श्री तावरजा विद्यालय शिरुर, श्रीराम विद्यालय ममदापूर, श्री रोकडेश्वर विद्यालय खाडगाव आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सध्या माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. बदलत्या काळानूसार ज्ञानच्या कक्षा रुंदावणे काळाचीच गरज आहे. परंतू, काळाची ही गरज म्हणुन इतन महत्वपुर्ण गोष्टींपासून दुर जाणे चुकीचे आहे. खरे तर मोबाईलमुळे वाचन संस्कृती जवळपास लोपच पावली आहे. अशा परस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.