लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या दुरदृष्टीतून मांजरा, तेरणा व रेणा या नद्यांवर एकुण २७ बराजेस् उभारण्यात आले. गेली दहा दिवस लातूर जिल्ह्यात पावसाचा धडाका सुरु आहे. त्यामुळे मांजरा नदीवरील ७ तर तेरणा नदीवरील ६ असे, एकुण १३ बराज १०० टक्के भरले आहेत. तर रेणा नदीवरील घनसरगाव, रेणपूर व खरोळा या तीन्ही बराजचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, रेणा या तीन्ही नद्या जलमय तुडंूब भरुन वाहत आहेत.
विकासरत्न विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर शहर व परिसरातील पाणीपुरवठा योजनेसाठी शाश्वत स्त्रोताच्या निश्चितीकरणासाठी उच्चाधिकारी समितीची नियुक्ती केली होती. उच्चाधिकार समितीने मांजरा नदीवर मांजरा धरणाच्या खालील बाजूस १००.०३ दलघमी पाणी उपलब्ध केल्यानूसार बोरगाव-अंजनपूर, वांजरखेडा, कारसा-पोहरेगांव, खुलगापूर, डोंगरगाव, धनेगाव येथे सहा बंधारे व तावरजा नदीवर भूसणी येथे एक असे एकुण सात बंधा-यांसाठी एकुण ७७.२३ दलघमी पाणी वापरण्याचे प्रस्तावित केले होते.
उच्चाधिकार समितीने प्रस्तावित केलेल्या पाण्याचे प्रत्यक्ष पाणीवापराचे फेरनियोजन करुन मांजरा नदीवर साई-महापूर, शिवणी, टाकळगाव-देवळा, होसून तालुका निलंगा तसेच लासरा तालुका कळंब येथे नवीन बॅरेजेस् प्रस्तावित करण्यात आले होते. मांजरा खो-यात अनियमित व अवेळी पडणारा पाऊस यामुळे कोल्हापूरी बंधा-यांमध्ये मनुष्यबळाने वाहत्या पाण्यामध्ये दरवाजे टाकण्याचे जिकिरीचे व अडचणीचे काम होते. कोल्हापूरी बंधा-यांमध्ये अपेक्षीत पाणीसाठा करता येत नव्हता. त्यामुळे परीसरात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते.
ही बाब लक्षात घेता कोल्हापूरी पद्धतीच्या बंधा-यांच्याद्वारांमध्ये नवीन तांत्रिक सुधारणा करुन बॅरेजेप्रमाणे उभ्या उचल पद्धतीचे विद्युत संचलीतद्वारे बसवून बॅरेजेमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास मंजूरी मिळाली आणि महाराष्ट्रात प्रथमच मांजरा नदीवरील बिंदगीहाळ, नागझरी, वांगदरी या तीन कोल्हापूरी बंधा-यांचे बॅरेजच्या धर्तीवर रुपांतर करण्यात आले. त्यामुळे बंधा-यांमध्ये पुर्ण क्षमतेने १०० टक्के पाणीसाठ्याची शाश्वत स्त्रोताची निर्मिती होऊन ९९३ हेक्टर सिंचन क्षेत्र पुर्नस्थापीत झाले आहे. त्याचा लाभ शेतक-यांना मिळत आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून सातत्याने पाऊस पडला. मांजरा, तेरणा, तावरजा व रेणा नदींच्या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या नद्यांवरील बराजची शृंखला जलमय झाली आहे. मांजरा नदीवरील साई, नागझरी, शिवणी, खुलगापूर, बिंदगीहाळ, होसूर व भूसणी हे ७ बराज १०० टक्के भरले आहेत. तर याच नदीवरील लासरा ४१.८० टक्के, वांजरखेडा ९९.९७ टक्के, टाकळगाव देवळा ७४.९० टक्के, वांगदरी ९९.२९ टक्के, कारसा पोहरेगाव ९६.७७ टक्के, डोंगरगाव ९९.९७ टक्के तर धनेगाव बराजमध्ये ८३.३५ टक्के पाणीसाठा आहे.
तेरणा नदीवरील राजेगाव, किल्लारी क्र. २, लिंबाळा, गुंजरगा, औराद शहाजनी, तगरखेडा हे ७ बराज १०० टक्के भरले आहेत. तर मदनसुर बराजमध्ये ७५.२० टक्के पाणीसाठा आहे. रेणा नदीवरील घनसरगाव, रेणापूर व खरोळा या तीन्ही बराजमध्ये खुप मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचा येवा वाढल्याने सिंचन विभागाने या बराजचे दरवाजे उघडण्यात आहेत. घनसरगाव बराजमध्ये ७४.७४ टक्के, रेणापूर बराजमध्ये ६३.९२ टक्के तर खरोळा बरामध्ये ६३.६० टक्के पाणीसाठा आहे. तेरणा नदीवरील बराज (समन्वय कार्यालयाचे प्रकल्प) किल्लारी कवठा बराजमध्ये १६.७४ टक्के तर सोनखेड बराजमध्ये १६.४० टक्के पाणीसाठा आहे.