लातूर : प्रतिनिधी
लातूरची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा नदीवरील लातूर तालुक्यातील मांजरी, सामनगाव जलसेतूजवळ मांजरा प्रकल्पाचा उजवा कालवा दि. १६ मे रोजी पहाटे फुटला. यामुळे हजारो दशलक्ष घनमीटर पाण्याची नासाडी झाली. शिवाय फुटलेल्या कालव्याचे पाणी शेतात घुसल्याने शेतीचे मोठे नूकसान झाले.
मांजरा प्रकल्पातून तीन उन्हाळी आवर्तन सोडण्याला मंजूरी देण्यात आली होती. त्यानुसार उजव्या व डाव्या कालव्यांद्वारे यापुर्वी दोन आवर्तने सोडण्यात आली. दि. १४ मे पासून तिसरे आवर्तन सुरु करण्यात आले आहे. उजव्या कालव्यातून ९ दशलक्ष घनमीटर पाणी दिले गेले. हे पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढील १८ दिवसांपर्यंत सुरु राहणार होते. परंतू, उजवा कालवा मांजरी, सामनगाव येथे ओढ्यावरुन जाणा-या पुलावर फुटला आहे. कचरा अडकला त्यामुळे पाणी तुंबून कालवा फुटला अशा सबबी पुढे केल्या जात आहे. परंतु, उन्हाळ्यात पाणी किती महत्वाचे असते. याची जाणिव ठेवुन संबंधीत यंत्रणेने कालव्याची देशभाल, दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र याकडे लक्ष दिले गेले नसल्यानेच कालवा फुटून हजारो दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेले.