लातूर : प्रतिनिधी
राज्यात नव्हे तर देश पातळीवर साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या मांजरा परिवारातील मुख्य आधारस्तंभ असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने आपल्या वाटचालीत शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीचे कार्य सातत्याने सुरु ठेवले. यातून शेतकरी समृध्द झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.. विद्यमान गाळप हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतक-यांच्या खात्यावर प्रती मेट्रिक टन २७०० रुपया प्रमाणे पुरवठा करणा-या शेतक-यांच्या खात्यावर बिलाची रक्कम जमा केली आहे.
सध्या मांजरा कारखान्याचा चालु गळीत हंगाम २०२४-२५ गाळप सुरु असुन १७ डिसेंबर रोजी अखेर कारखान्याने १,१४,०४० मे. टन उसाचे गाळप केलेले असून ८७,४५० मे. टन साखर उत्पादन केले आहे. तसेच ४७,४९,६३५ के डब्ल्यू एच विजेची निर्यात वीज वितरण कंपनीस केली असून ११,५९,४३३ लिटर इथेनॉलचे उत्पादन केला आहे. मांजरा परिवाराचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी शेतकरी हिताचा विचार करून जाहीर केल्याप्रमाणे गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गळीतास दिलेल्या उसापोटी पहिली उचल प्रति मे. टन २७०० रुपयांप्रमाणे अदा करण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला असुन, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या निर्णयानुसार दि. २५ नोव्हेंबर २०२४ ते १० डिसेंबर २०२४ या दरम्यान गळीतास आलेल्या ऊसाला २७०० रुपये प्रति मे.टन याप्रमाणे मंगळवार दि. १७ डिसेबर रोजी संबधीत ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले आहेत.
ज्या ऊस उत्पादकांचा ऊस कारखान्यास गाळपास आलेला आहे त्यांनी आपल्या बँक शाखेतून ऊस बिलाची रक्कम उचल करावी व सर्व जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी आपला ऊस मांजरा कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन सन्माननीय संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी केले आहे.