विलासनगर : प्रतिनिधी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरी बुद्रुक पुणे या संस्थेकडून राज्य पातळीवरील उत्तर पूर्व विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास नुकताच जाहीर झाला आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या अथक परिश्रमातून व दूरदृष्टीच्या नियोजनातून माळरानावर मांजरा साखर कारखान्याच्या माध्यमातून नंदनवन फुलले आहे. लाखो शेतक-यांच्या जिवनात आर्थिक क्रांतीचे नवे पर्व सुरु करुन सहकार क्षेत्राचा उद्देश मांजरा कारखाना नेतृत्वाने व संचालक मंडळाने सफल करुन दाखवला आहे. मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली कारखान्याने गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडून एक आदर्श निर्माण केला आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याच्या आजपर्यंतच्या दैदिप्यमान कारकिर्दीत राज्य व देश पातळीवरील अनेक पुरस्कार देवून कारखान्यास गौरवण्यात आले आहे. कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये मिल मधील उसाचा तंतूमय निर्देशांक, रिडयुस्ट मिल एक्स्ट्रॅक्शन, साखर तयार करण्यासाठी लागणा-या वाफेचा, विजेचा, बगॅस वापर, गाळप क्षमतेच्या वापरामध्ये वाढ, गाळप क्षमतेचा वापर,तसेच इतर निकष पाहता सदरील पुरस्कार विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यासंस्थेच्या वतीने गळीत हंगाम २०२२-२३ या सालातील सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता द्वितीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख, सन्माननीय संचालक माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, कार्यकारी संचालक तसेच संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी यांचे कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांकडुन अभिनंदन होत आहे.