34.1 C
Latur
Friday, May 2, 2025
Homeमहाराष्ट्रमाजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

अहिल्यानगर : विधान परिषदेचे माजी आमदार अरुण बलभीमराव जगताप यांचे आज, शुक्रवारी पहाटे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अहिल्यानगर शहरातील अमरधाममध्ये अन्त्यसंस्कार केले जाणार आहेत. अरुण जगताप हे काका नावाने ओळखले जात. त्यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली.

अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होत. त्यांचे दुसरे चिरंजीव सचिन जगताप हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तर स्नुषा शीतल संग्राम जगताप या माजी नगरसेविका तसेच पत्नी व एक विवाहित कन्या असा परिवार त्यांच्यामागे आहे. भाजप आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व अहिल्यानगर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे ते व्याही होत.

अरुण जगताप गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात महिनाभरापासून उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी त्यांचे पार्थिव सारसनगर भागातील निवासस्थानी अन्त्यदर्शनासाठी ठेवले जाईल, नंतर सायंकाळी अन्त्यसंस्कार करण्यात येतील.

युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून अरुण जगताप यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नगरसेवक, नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. काहीकाळ ते शिवसेनेतही गेले होते. नंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले. त्यानंतर ते सलग दोनवेळा विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून गेले. तत्पूर्वी त्यांनी दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवली. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्रसेवा संस्थेचे अध्यक्ष यासह विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. अश्वपालनाचा व मोटारींचा त्यांना छंद होता. त्यांच्याकडे उत्तम पैदासीचे अनेक घोडे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR