मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे चार दिवस राहिले असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या शिवशक्ती युतीच्या मुंबईतील पहिल्या जाहीर सभेच्या दिवशीच ‘मातोश्री’शी प्रामाणिक असलेले आणि सच्चे शिवसैनिक म्हणून ओळख असलेले शिवडीचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवडीमध्ये उमेदवारी देताना उद्धव ठाकरे यांच्याकडून साधी विचारणाही झाली नाही, संपर्क करण्यात आला नाही, यामुळे नाराज झालो असल्याची खंत त्यांनी शिंदेसेनेतील पक्षप्रवेशावेळी व्यक्त केली.
उद्धव आणि राज ठाकरे यांची आज मुंबई महापालिका निवडणुकीसीठीची जाहीरसभा शिवाजी पार्क येथे होत आहे. त्याच दिवशी ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीला अवघे चार दिवस उरले असताना ‘मातोश्री’सोबत एकनिष्ठ अशी ओळख असणारे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
दगडू सकपाळ हे मुंबईतील शिवडीचे माजी आमदार आहेत. त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी होती. मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची मुलगी रश्मी सकपाळ यांना वॉर्ड क्रमांक २०३ मधून लढण्याची इच्छा होती.
मात्र पक्षाने तिकिट नाकरले. याबद्दल दगडू सकपाळ म्हणाले की, काही अडचणी होत्या तर त्या मला सांगायला पाहिजे होत्या. मला एक फोन करून सांगितले असते, हे लोक म्हणतात की रश्मी निवडून येणार नाही. तर ते लोक कोण आहेत त्यांना माझ्या समोर आणायचे असते. मात्र आम्हाला साधे विचारले देखील नाही. एक फोन करून तरी सांगायचे होते, अशी खंत माजी आमदार सकपाळ यांनी व्यक्त केली.
मला ‘मातोश्री’नेच मोठं केलं, मी मोठा झालो तो ‘मातोश्री’मुळेच, हे मी कधीही नाकारत नाही, असेही सकपाळ म्हणाले. ते म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाही, भाजपमध्ये जाऊ शकत नाही. मग कोणता पक्ष शिल्लक राहिला. तर हाच राहिला. मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मातोश्री’कडून संपर्क झाला नाही, मी म्हातारा झालो म्हणून का, अशी खंत व्यक्त करत त्यांनी शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
दगडू दादांचे नेतृत्व दगडासारखे कणखर आणि मजबूत- एकनाथ शिंदे
दगडू सकपाळ यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दगडू सकपाळ यांनी शिवसेना वाढवण्यासाठी अपार कष्ट घेतले. दगडू दादांच्या प्रवेशामुळे ख-या अर्थाने लालबाग राजाचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला आहे. दगडू दादांचे नेतृत्व बघितले तर दगडासारखे कणखर आणि मजबूत आहे. दगडू दादा हे मुंबईतल्या शिवसेनेच्या पायाचा दगड आहेत. पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत होते. बाळासाहेबांनी हेरलेली माणसे शिवसेना पुढे घेऊन जात होती. परंतु, त्याचे मोल आताची उबाठा जाणत नाही आणि अशा कडवट कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे निर्णय का घ्यावे लागतात, याचा विचारही करत नाही. गेला की तो कचरा, असे बदनाम करतात. याने पक्ष मोठा होत नाही. ज्यांनी कष्ट केले, जेल भोगली, त्यांची अवहेलना करणे हे दुर्दैवी आहे.

