मुंबई : प्रतिनिधी
मुंबई संघाचे माजी कर्णधार आणि सिलेक्टर मिलिंद रेगे यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मिलिंद रेगे हे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे मित्र होते. ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, मुंबईचे माजी कर्णधार आणि सिलेक्टर असणारे मिलिंद रेगे ७६ वर्षांचे होते. गेल्या रविवारीच मिलिंद रेगे यांचा वाढदिवस झाला. रेगे यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते आणि बुधवारी सकाळी ६ वाजता त्यांचे निधन झाले. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन मुले आहेत.
अष्टपैलू म्हणून खेळणा-या रेगे यांना वयाच्या २६ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला पण ते क्रिकेटच्या मैदानावर परतले आणि रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्वही केले. १९६६-६७ ते १९७७-७८ दरम्यान त्यांनी ५२ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि त्यांच्या ऑफ-स्पिन गोलंदाजीने १२६ बळी घेतले. त्यांनी फलंदाजीमध्येही योगदान दिले आणि २३.५६ च्या सरासरीने १,५३२ धावा केल्या. हृदयविकाराच्या झटक्यानंतरही त्यांनी क्रिकेटमध्ये अभूतपूर्व योगदान दिले. मात्र यावेळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे अचानक त्यांचे निधन झाले.