मुंबई : प्रतिनिधी
माजी नगरसेवक आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक नाना महाले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला धक्का बसला आहे. आपल्या विविध समर्थकांसह महाले यांनी मंगळवारी पुन्हा एकदा हातात घड्याळ बांधले.
महाले यांच्या प्रवेशानंतर त्यांच्या समर्थकांनी ‘घड्याळ तेच वेळ नवी’ असे सांगत त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले आहे. महाले महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांचे बंधू देखील तीन वेळा नगरसेवक होते. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला शहरात अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाला आहे. मात्र महाले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यासाठी आपण हा प्रवेश केला आहे. पक्षाच्या कामकाजात सहभागी होणार आहोत. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असून आपण पक्षाकडे कोणतीही मागणी केलेली नाही, असे सांगितले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर आदी नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई कार्यालयात त्यांनी प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते.
माजी नगरसेवक महाले यांच्यासमवेत मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, अक्षय परदेशी, राहुल कमानकर, ज्ञानेश्वर महाजन, सुनील घुगे, सुनील अहिरे, राजेंद्र पवार, अरुण निकम यांचे विविध पदाधिकारी आणि नेत्यांचाही यावेळी प्रवेश झाला.