दूरदृष्टी असलेला नेता हरपला, देशात शोककळा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उदारीकरणासारखे महत्त्वाचे धोरण राबवून देशाला आर्थिक बळ देणारे एक दूरदृष्टी असलेले नेते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे गुरुवारी रात्री वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. २००४ ते २०१४ या काळात ते भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. भारतात अर्थक्षेत्रात क्रांती घडवून आणणा-या डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे.
डॉ. मनमोहनसिंग हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. याआधी देखील त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज प्रकृती बिघडल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर एम्समधील डॉक्टरांचे एक पथक लक्ष देऊन होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची गुरुवारी रात्री प्राणज्योत मालवली. मनमोहनसिंग यांना फुफ्फुसात इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी एम्स रुग्णालयात हजेरी लावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. परंतु काही वेळातच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
दरम्यान, डॉ. मनमोहनसिंग यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच कॉंग्रेस पक्षाच्या अधिवेशनासाठी बेळगावात दाखल झालेले कॉंग्रेस नेते अधिवेशन रद्द करून तात्काळ दिल्लीकडे रवाना झाले. यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी यांच्यासह इतर नेतेही दिल्लीत दाखल झाले.
मनमोहनसिंग यांनी २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस नेतृत्वातील यूपीए सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून धुरा सांभाळली. तत्पूर्वी, १९९१ ते १९९६ या काळात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्या काळात देश आर्थिक संकटात असताना त्यांनी घेतलेल्या उदारीकरणाच्या निर्णयामुळे देशाची मोठी आर्थिक वृद्धी झाली. यामुळे भारतात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आली. त्यांनी अर्थमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून देशाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या. त्यामुळे भारतीय राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
मनमोहनसिंग यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. ३३ वर्षे ते खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर १० वर्षे देशाचा राज्य कारभार सांभाळणारे पंतप्रधान ठरले. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. १९९१ साली राज्यसभेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
मनमोहनसिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे १४ वे पंतप्रधान होते. मनमोहनसिंग हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित होते. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ इथून शिक्षण घेतले. त्यांनी १९५७ ते १९६५ या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. ते १९६९-७१ या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर १९७६ मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
देश विकासात मोठे योगदान
१९८२ ते १९८५ या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तर १९८५-८७ या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. १९९० ते १९९१ या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. त्यानंतर १९९१ मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री राहिले. त्यानंतर सलग दोन टर्म म्हणजे २००४ ते २०१४ पर्यंत ते देशाचे पंतप्रधान राहिले. त्यामुळे देश विकासासाठी त्यांचे अनेक निर्णय महत्त्वाचे ठरले आहेत.
महत्त्वपूर्ण निर्णयामुळे
देश विकासाला गती
डॉ. मनमोहनसिंग २००४ मध्ये पंतप्रधान झाले, त्यावेळी अॅक्सिडेंटल प्राईममिनिस्टर म्हटले गेले. परंतु त्यांच्या काळातील महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देश विकासाला गती मिळाली. त्यांनी ६ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांन मोफत शिक्षण, लोकशाही मजबुतीच्या दृष्टीने माहितीचा अधिकार दिला. भूकबळी ठरू नये, यासाठी अन्नसुरक्षा कायदा, भूसंपादन कायदा, वनअधिकारी कायदा, १०० दिवसांचा रोजगार देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), इंदिरा गांधी मातृत्व योजना यासारखे ऐतिहासिक निर्णय घेतले.