लातूर : प्रतिनिधी
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माळी सेवा संघ महाराष्ट्रच्या वतीने सेवा संघाच्याच कार्यक्रमातील साहेबांच्या छायाचित्राची फ्रेम देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ््याचा प्रश्न मार्गी लावावा आणि माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन दिले. या प्रश्नी त्यांनी सकारात्मक चर्चा केली आणि दोन्हीही प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
लातूर येथील आंबेडकर पार्कच्या बाजूला क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ््याशेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासंबंधी माळी सेवा संघ, महाराष्ट्रच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यासंदर्भात महापालिकेने कायदेशीर मान्यताही दिली आहे. मात्र, याबाबत अद्याप वर्कऑर्डर निघालेली नाही. त्यामुळे पुतळ््याचा प्रश्न मार्गी लावावा आणि लातूरमध्ये माळी समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहासाठी जागाही उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन माळी सेवा संघाच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळयाचा प्रश्न मार्गी लावला जाईल आणि माळी समाजातील विद्यार्थ्यांसाठी लातूरमध्ये वसतिगृहाचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. त्यासाठी १० हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यावी लागेल, असे म्हटले. यासोबतच विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजहित कसे साधता येईल, या दृष्टीने पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. यावेळी माळी सेवा संघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पद्माकर वाघमारे, बाळासाहेब फासे, दत्तात्रय दापके, प्रा. अनिलकुमार माळी, बबन माने, कमलाकर वाघमारे, पांडुरंग माळी, तुळशीदास गोंदरकर, बालाजी वाघमारे, सुधाकर फुटाणे, सर्वेश वाघमारे, प्रा. लक्ष्मण बादाडे, प्रकाश नाळवंडीकर, अशोक पवळे, दिगंबर पेठकर, संदीपान माळी, अॅड. देवाजी गोरे, रमेश उगले, सतीश जगताप, प्रदीप घुरे, विवेक गोरे, चंद्रकांत खडबडे, अमोल माळी, गणेश माळी, महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिताताई फुटाणे, मायाताई गोरे, अंजलीताई फासे आदी मान्यवर उपस्थित होते.