लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त आज दि. २६, मे रोजी सकाळी ९ वाजता विलासबाग, बाभळगाव येथे सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री म्हणून विकासरत्न विलासरावजी देशमुख यांना लोककल्याणाची विचारवाहिनी म्हणून आपण सर्व जण ओळखतो. त्यांनी आपल्या कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांच्या जोरावर भारतीय राजकारणात एक विशेष स्थान निर्माण केले. सार्वजनिक जीवनात बाभळगावचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री, असा यशस्वी राजकीय प्रवास केला. सामान्य जनतेप्रती आपुलकी आणि लोककल्याणकारी कामात धडाडी यामुळे त्यांना मोठी लोकप्रियता लाभली. संघटन कौशल्य, लोकांचे पाठबळ यांमुळे ते नेहमी निर्णायक भुमिकेत राहिले. मिळालेल्या संधीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार, आर्थिक आदी क्षेत्रांत भरीव कार्य केले. जलसंधारण, बराज बांधणी आदी अभिनव प्रयोग करून राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवले.
साखर कारखानदारी तसेच तेल, दाळ आदी कृषीपुरक उद्योगाला चालना देऊन ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवली. शहरातील दळणवळण आणि उद्योग उभारणीला गती देऊन विकास प्रक्रियेत समतोल साधला त्यामुळे जनमाणसात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव कायम आहे, अशा कर्तृत्वसंपन्न नेतृत्वाच्या ८० व्या जयंतीनिमित्त आज दि. २६, मे रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या कार्याला स्मरणपूर्वक आदरांजली वाहण्यात येणार आहे. या सभेसाठी सकाळी सर्वांनी ८.४५ वाजता विलासबाग येथे स्थानापन्न व्हावे, अशी अपेक्षा आहे.
सकाळी ९ वाजता सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक भारतरत्न भीमसेन जोशी यांचे शिष्य किराणा घराण्यातील गायक आणि बालगंधर्व या चित्रपटाचे पार्श्वगायक आनंद भाटे व त्यांच्या सहका-यांकडून तीर्थ विठ्ठल, माझे माहेर पंढरी, इंद्रायणी काठी, चिन्मया सकल हृदया या गीतांसह शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भाव स्वरांजली हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. उपस्थित सर्वांनी पुष्पांजली अर्पण केल्यानंतर १० वाजता आदरांजली सभेचा समारोप होईल. या सभेचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे व सचिन सूर्यवंशी करणार आहेत. या आदरांजली कार्यक्रमास विलासबाग, बाभळगाव येथे जनतेने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.