मुंबई : प्रतिनिधी
फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या हा अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी केली आहे. या आरोपावर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नुसते आरोप-प्रत्यारोप करून चालणार नाही. मीडिया ट्रायल करू नये. पार्थ माझ्या मुलासारखा आहे. तो कधीच गैरव्यवहार करणार नाही. माझा पार्थवर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर एका जमिनीच्या खरेदी व्यवहाराप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पुढे सुळे म्हणाल्या, कादगपत्रं व्यवस्थित तपासायला हवीत, ही सरकारची जमीन असेल तर असं कसं असेल? जमिनीचा व्यवहार कसा होईल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून पार्थला कोणी फसवलंय का? असा संशयही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. मी काही कागदपत्रं पाहिली नाहीत. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा काय व्यवहार आहे हे तपासावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. मला त्या व्यवहाराबद्दल काही माहिती नाही. घाईघाईने बोलण्यापेक्षा मी पार्थशी बोलेन असेही त्या म्हणाल्या.
३०० कोटींची जमीन घेण्यासाठी पैसा कुठून येतो? या प्रश्नावर मी माहिती घेते आणि उत्तर देते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मला रेवती, विजय आहेत तसे रोहित, पार्थ ही सर्व मुले आमचीच आहेत. लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण पार्थची बाजू जाणून घेऊया, असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्यावर होणा-या आरोपांवर मत मांडले.
पार्थ पवारांच्या पिताश्रींच्या राजीनाम्यापर्यंत लढू – अंधारे
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांकडूनच जर एवढी मोठी गोष्ट घडत असेल तर आत्ता आपण यावरती काय बोलायचं? २१ कोटींचा महसूल बुडवणे ही सरकारची फसवणूक आहे. गोरगरिबांनी सगळे कर भरायचे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना मोकाट सोडायचं हे वाईट आहे. पक्ष म्हणून आम्ही भूमिका घेऊ. गरज पडली तर ज्या चिरंजीवांनी हे केलंय त्यांच्या पिताश्रींचा राजीनामा घेण्यापर्यंत आम्हाला लढावं लागेल, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

