छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेले शिरसाट कुठल्या ना कुठल्या विधानांमुळे सतत वादात असतात. त्यात आता पुन्हा त्यांचा एक नव्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान डीजे मुळे त्रास होतो. डीजेऐवजी बाहेरगावचे भारी बॅण्ड पथक, ढोल पथकावर भर लावा. पैशांसाठी व्यासपीठावर नेते आहेत, त्यांनी नाही दिले तर शेवटी मी आहेच. माझी बॅग उघडीच आहे. आपण व्हिडीओची चिंता करत नाही, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर सभेत म्हटले आहे.
व्यासपीठावरून केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. मात्र सततच्या विधानाने वादात अडकलेले शिरसाट थांबायचं काही नाव घेत नाही अशीही चर्चा यानंतर सुरू झाली आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळेस बेडरुममध्ये पैशांची बॅग घेऊन बसल्याचा मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ आता पुन्हा गणेशोत्सवाच्या निमित्ताने चर्चेत आलाय तो शिरसाट यांनीच जाहीर सभेत केलेल्या एका विधानामुळे. या विधानावरूनही शिरसाटांवर कठोर शब्दांमध्ये टीका होताना दिसत आहे.
त्या बॅगेत १२ ते १५कोटी होते
त्यांच्या बॅगेत १२ ते १५ कोटी रुपये असतील. त्या बॅगेत शिरसाट यांचे पैसे नव्हते गरीब जनतेचे पैसे होते. आता त्या बॅगवर ते बोलत असतील तर अयोग्य आहे. आता ते बॅगेतील पैशाबाबत उघड बोलत आहेत. भ्रष्टाचाराबाबत उघड बोलत आहेत. त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्यात यावा यातही आम्ही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन करू,असं शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राऊतांनी साधला निशाणा
संजय शिरसाट गणेश उत्सव डीजे वाजवा पैसे माझी बॅग खुली आहे, असे म्हटल्याच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनीही टोला लगावला आहे. हे जे लुटलेले पैसे आहेत ते त्या बॅगेत आहेत. त्याच्यावर गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.