लातूर : प्रतिनिधी
माझी वसुंधरा दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषेध्येचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अस्लम तडवी यांनी सिकंदरपूर येथील आय.एस.ओ. वैकुंठ धाम येथे भेट देत तेथे ग्राम संसद राबवत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
या वेळी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, पाणी व स्वछता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहन अभंगे, उद्धव फड, चांगदेव डोपे, संजय मोरे, बी.आर.सी.चे उत्तरेश्वर कांबळे, यशदाचे प्रवीण प्रशिक्षक माधव गंभीरे, सरपंच सौ. रेशमा माधवराव गंभीरे, ग्रामपंचायत अधिकारी के. बी. कलबूने, पाणी पुरवठा कर्मचारी भास्कर गरगट्टे, कर्मचारी गहिनीनाथ बोयने, ग्रामरोजगार सेवक दिगंबर कदम, संगणक परिचालक महेश गंभीरे उपस्थित होते.
२०१२-१३ मध्ये गट नं ९४ मध्ये तत्कालीन सरपंच माधव शामराव गंभीरे यांनी ३० गुंठे जागा वाहिवाटी आधारे जिल्हा न्यायालयाकडून व जिल्हा महसूल प्रशासनाकडून ताब्यात घेतली होती. २०२१ मध्ये सिकंदरपूरच्या उपक्रमशील सरपंच सौ. रेशमा माधवराव गंभीरे यांच्या पुढाकारातून ७ जून २०२२ रोजी १६७६ मियावाकी वृक्षाची लागवड करून इतर फळाची, सावलीची, जास्त प्रमाणात ऑक्सिीजन देणा-या २०० वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. चोहूबाजूनी आर. सी. सी. कंपाउंड बांधून वन गेट मधून मुस्लिम व वडार समाजासाठी वेगवेळी दफनभूमी व हिंदू साठी दहन भूमिमध्ये नागरिकांच्या अंत्यविधीचे नियोजन करण्यात आले आहे. तेथे बसण्याची व्यवस्था असून रक्षा सावडल्या नंतर हात धुण्यासाठी दोन हॅन्डवाश स्टेशनची व्यवस्था केली आहे.
तसेच महिला व पुरुषासाठी सार्वजनिक शौच्छालय व वॉशरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील पडलेल्या झाडांच्या पाना फुलापासून व अंत्यविधीसाठी आलेल्या फुलांच्या हराना कुजवण्यासाठी नाडेफ कंपार्टमेंटचे दोन प्रकल्प व एक गांडूळ खत प्रकल्प बांधण्यात आली आहेत. रात्रीचे अंत्यविधी करण्यासाठी सौर ऊर्जेचे स्मार्ट लाईट बसवण्यात आले आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे तेथे मियावाकी मध्ये बांधलेल्या पक्षासाठी पाण्याच्या कुंड्या लावलेल्या असून मोर हरणासाठी जमिनीमध्ये २ पाणवठे तयार केले असून मोरांचा थवा त्या मध्ये डुबकी मारत स्वच्छ पाणी पीत असतात. त्यामुळे खुप वेगवेगळ्या पक्षांनी आपली घरटी वैकुंठधाम मध्ये थाटली आहेत. भर उन्हाळ्यात हिरवी गार वनराई पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष वेधत आहे.