मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे ३९५ वी जयंती आहे. या शिवजयंतीनिमित्त राजकीय नेते सोशल मीडियावर पोस्ट करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनीही ट्वीट करत ‘माझ्या आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव असल्याचे सांगत महाराजांना अभिवादन केले आहे.
दरम्यान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे ३९५ वी जयंती आहे. यानिमित्त राज ठाकरे यांनी ट्वीट करताना म्हटले की, माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे. त्यामुळे कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शून पण जात नाही आणि झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते.
खरंतर महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी व्हायला हवी, इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण ३६५ दिवस साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून ३६५ दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केले पाहिजे. वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पहायचे, त्याची ध्येयधोरण आखायची आणि स्वत:च आर्थिक चलन आणायचे, फार्सी भाषा नाकारून स्वत:चा मराठी शब्दकोश निर्माण करायचा आणि पुढे एक एक किल्ले जिंकायचे.यासाठी एक अद्वितीय प्रतिभाच असली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
महाराजांच्या आयुष्याकडे बघितलं की नेहमी कुतूहल वाटते की ही समज इतक्या लहान वयात कुठून आली असेल. आजकाल छोट्या छोट्या पीछेहाटीने किंवा नकाराने नैराश्य येण्याच्या काळात, प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पारायण केले तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा महाराजांनी किती शांतपणे स्वराज्य उभे केले हे जाणवेल आणि मग असली किरकोळ नैराश्य कधीच येणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले.
राज ठाकरे म्हणाले की, माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे. त्यामुळे कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शून पण जात नाही आणि झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही. मला जे योग्य वाटते ते मी विचारांती बोलतो आणि हे करताना महाराष्ट्र घडवण्याचे माझे जे ध्येय आहे, त्यावरची अगाढ श्रद्धा टिकून राहते. हे सगळे मला शिवचरित्राने दिले आहे. त्यामुळे जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून सदैव मिळत राहू दे हीच इच्छा. छत्रपती शिवाजी महाराज या अलौकिक नायकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानाचा मुजरा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.