मुंबई : प्रतिनिधी
अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याची काल दिवसभर चर्चा होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही दोन दिवसांपूर्वीच एसटी बसच्या चालक-वाहकांच्या पगारावरून अजितदादांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसेनेचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी माझ्या खात्याला पुरेसा निधी मिळत असल्याचे सांगत एकनाथ शिंदेंविरोधात वेगळाच सूर लावला आहे.
दरम्यान, अर्थखात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे, अशी चर्चा शनिवारी दिवसभर सुरू होती. त्यावर शिवसेनेचे जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, त्या संदर्भातली माहिती मी आता देऊ शकत नाही. तो काय विषय आहे, याची माहिती घेऊन मी बोलतो.
शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्याला निधी मिळत नाही, असे मला तरी कुठं दिसलं नाही. माझ्या जलसंधारण खात्याला प्रस्तावित करण्यात आलेला निधी मिळालेला आहे, प्रत्यक्ष अनुदानही मंजूर झाले आहे. जलसंधारण खात्याला यापूर्वीही पैसे मिळाले आहेत, आताही पैसे मिळत आहेत, असेही संजय राठोड यांनी स्पष्ट केले.
मी चारदा मंत्री झालो आहे आणि पाचव्यांदा निवडून आलो आहे.
राज्यात सध्या वेगवेगळ्या योजना चालू असतात. जसे लाडकी बहीण योजना चालू आहे. विकासाचे प्रकल्प आहेत, त्यामुळे निधी वाटपात १९-२० होतं. मात्र, त्याचा अर्थ असा नाही की खात्याकडे दुर्लक्ष होतं किंवा खात्याला पैसेच मिळत नाहीत. माझ्या तरी खात्याला निधी मिळाला आहे. चांगलं काम करण्याचा प्रयत्न अधिकारी आणि प्रशासन करत आहेत.