बारामती : प्रतिनिधी
बारामतीत विकास कामे करतो आहे. पण काही जण वेडेवाकडेपणा करतात. एक जण तर फुटपाथवर गाडी लावून गप्पा मारत होते. पोलिसांना गाडी जप्त करायला सांगितली आहे. एक व्हीडीओ तुम्ही पाहिला असेल, त्यामध्ये दोन मोटारसायकलवरून चार मुलं आली. त्यांनी एकाला मार मार मारले. त्याला बेल्ट, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अजित पवारांच्या कितीही जवळच्या कार्यकर्त्याच्या मुलाने असे केले तरी त्याला सोडणार नाही. तो असेच गुन्हे करत राहिला तर मोेक्का लावायला कमी करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
बारामतीमधील मारहाणीचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून अजित पवारांनी आज बारामतीमध्ये कोणीही कायदा हातात घेतला तर त्यांना सोडणार नाही, असा दम भरला आहे. ते म्हणाले की, तुमची मुलं-मुली काय करत आहेत, हे पाहणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पालक, नातेवाईकांनी पार पाडली पाहिजे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांनाही वेळीच कारवाईचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘वनवे, पार्किंग, गार्डन अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी कोणतेही गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांनाही एक स्पेशल गाडी दिली जाईल, त्यांनी या सर्वांवर नजर ठेवायची आहे. कोणाचेही चुकीचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही. गैरकृत्य करणारा अजित पवारांच्या कितीही जवळचा असला, तरी त्याला माफी नाही. कोणी काही चूक केली असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्ग आहे. त्यांची पोलिसांकडे तक्रार करा, पण कोणीही कायदा हातात घेतला तर त्याला मोक्का लावायला कमी करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी बारामती येथील कार्यक्रमात दिला.
कोणी काही गैरकृत्य केले आणि त्यानंतर माझ्याकडे येतात आणि म्हणतात दादा, पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या? पोट फुटायला लागलंय. ज्यांनी फोन केला त्यांना लाज, शरम कशी वाटत नाही, असेही अजित पवारांनी गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करणा-यांना खडसावले आहे.