मुंबई : प्रतिनिधी
जगभरामध्ये नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले जात आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन आशा-आकांक्षांसह नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. सर्व क्षेत्रातील दिग्गज लोकांनी देखील २०२५ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करून नवीन वर्षासाठी संकल्प सांगितला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या नवीन वर्षाच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा! कालगणनेत या वर्षाला एक महत्त्व आहे, कारण या शतकातील, पाव शतक संपायला आले. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीचे आयुष्य हे वेगळे युग वाटावे.
या २५ वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले. आणि हे सगळे आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेले. या २५ वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणे, तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणा-यांना नोकरीच्या संधी मिळणे.
बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणे लावणे. शेतक-यापासून ते सर्वच कष्टक-यांचे आयुष्य महागाईने होरपळून निघणे आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमके मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे.
महागाईने होरपळलेल्यांना दिलासा द्यायला हवा, यासाठी साठेबाजी होत नाहीये ना, हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्यांना करा आणि त्याच्या जोडीला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आपल्या शाखा, कार्यालये पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा. आणि हो, हे सगळं करताना सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार-प्रसारासाठी वापरायचा आहे पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना, त्याच्या अधीन जात नाही आहोत ना हे पहा.
लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच. तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा!