अमरावती : प्रतिनिधी
माझ्या पराभवाचे श्रेय राणा दापत्याने घेऊ नये, असा हल्लाबोल प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर केला आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून ते रिंगणात होते. त्यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाचे श्रेय विरोधक घेत आहेत. त्यावरून माजी आमदार बच्चू कडू यांनी राणे दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. बच्चू कडू हे महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून रिंगणात होते. तर दुसरीकडे त्यांचे कट्टर विरोधक रवी राणा हे विजयी झाले आहेत. राणा दाम्पत्यामुळे बच्चू कडू यांचा पराभव झाला, अशी चर्चा आहे. त्यावर बच्चू कडू यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
माझ्या पराभवाचे श्रेय राणांनी घेऊ नये, या निवडणुकीत महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते, अन् मी पडलो असतो, तर मी त्याचे श्रेय राणांना दिले असते. ते म्हणतात, बच्चू कडू को हमने गिराया, पण मला पाडण्याची त्यांची औकात नाही. त्यांच्यात हिमंत असेल कुठलीही निवडणूक माझ्याविरोधात अपक्ष म्हणून लढवून दाखवा, असे आव्हान बच्चू कडू यांनी त्यांना दिले.
बडनेरा मतदारसंघात रवी राणा यांनी मोठा विजय मिळवला आहे. ६० हजारांहून जास्त मते त्यांना मिळाली आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि प्रहार जनशक्ती पक्षांच्या उमेदवारांवर मात केली आहे. राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सुनील खराटे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रीती बंड निवडणुकीच्या रिंगणात होते.
अमरावती जिल्ह्यात रवी राणा आणि बच्चू कडू हे कट्टर विरोधक आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील या लढतीमध्ये विद्यमान आमदार बच्चू कडू यांचा भाजप उमेदवार प्रवीण तायडे यांनी १२ हजारहून अधिक मताधिक्क्याने पराभव केला आहे. २००४ पासून बच्चू कडू हे सलग ४ वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला.