पंढरपूर -पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरू आहे. बेदाणा सौदे बाजारात वेळेचे नियोजन व्हावे म्हणून सहा आडत व्यापाऱ्यांना केवळ एका दिवसांसाठी सौदे करू नये अशी सूचना करण्यात आली होती. मात्र यामुळे ३०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असा आवाज आ. अभिजीत पाटील यांनी चक्क विधानसभेत उठविला होता.
आमदार अभिजीत पाटील यांना त्यांच्या मतदार संघातील शेतकऱ्यांचा इतका कळवळा असेल तर त्यांनी माढा आणि कुडूवाडी येथे बेदाणे सौदे सुरू करावेत, अशी उपरोधिक टिका पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी केली. अधिवेशनामध्ये विधानसभेत आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्याच्या वेळी शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीबद्दल प्रश्न उपस्थित केलेला होता. त्याबाबत पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार अभिजीत पाटील यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस प्रशांत देशमुख उपस्थित होते.
पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा सौदे बाजार चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून अडत व्यापारी व शेतकऱ्यांना सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यात १३१ कोटी रुपयांच्या बेदाण्याची विक्री झाली तसेच बेदाण्याला विक्रमी ६५१ रुपये विक्रमी दर मिळाल्याचे सांगितले.
बेदाणा सौदे बाजार दुपारी दोन वाजता सुरू होतो. बाजार समितीमध्ये ३० आडत व्यापारी आहेत. प्रत्येकाला पंधरा मिनिटे दिल्यास सौदे बाजार होण्यास रात्रीचे दहा वाजतात. विशेष म्हणजे सूर्य मावळल्यानंतर बेदाणा कलर व्यवस्थित दिसत नाही. यामुळे शेतकऱ्यांना दर कमी मिळतो. यासाठी बेदाणा सौदे बाजार सूर्यास्ताच्या आत व्हावेत अशी मागणी शेतकरी व बेदाणा असोसिएशन यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन बाजार समितीने ट्रायल बेसीसवर सहा व्यापाऱ्यांना एका दिवसांसाठी बेदाणा सौदे बाजारात सहभाग घ्यावयचा नाही अशी नोटीस दिली होती अशी माहिती सभापती गायकवाड यांनी दिली. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतच मागच्या आठवड्यातील ज्या मंगळवारच्या सौद्याची विधानसभेपर्यंत ऐवढी चर्चा झाली.
त्या सौद्याच्या वेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच २५२ गाडी बेदाण्याची आवक झालेली होती. एक गाडी दहा टनाची या हिशोबाने साधारण पंचवीसशे टन माल विक्रीसाठी आलेला होता. त्यामधील बावीसशे टन माल विक्री झाला. त्या बावीसशे टनाला सरासरी दोनशे ते अडीचशे रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. तर बाजार समितीमध्ये एका दिवशी ६० ते ६१ कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक विक्री त्या दिवशी झालेली आहे. महाराष्ट्रात एका दिवशी बेदाण्याच्या एका किलोला ६५१ रुपये इतका विक्रमी दर हा पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतच त्या दिवशी मिळालेला असल्याचे देखील सभापती हरिय गायकवाड यांनी सांगितले
.गेल्या आठवड्यात झालेल्या बेदाणा सौदे बाजारात सहा व्यापाऱ्यांना सहभागी होण्यास मनाई करण्यात आली होती. यामुळे ३०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले म्हणून आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत आवाज उठविला. आमदार पाटील यांनी कोणकोणत्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या नावाची आम्हाला यादी द्यावी अन्यथा आमदार पाटील यांनी त्यांच्या मतदार संघात असलेल्या ४२ गावातील शेतकऱ्यांसाठी वेगळी बाजार समिती निर्माण करावी असे गायकवाड यांनी सांगितले.पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालास व बेदाणा डाळिंबला चांगले दर मिळावेत म्हणून माजी आमदार (कै.) सुधाकरपंत परिचारक यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून डाळिंब व बेदाणा सौदे बाजार सुरू केले. राज्यात सर्वत्र डाळिंब कौटवर विक्री होत असताना परिचारक यांनी पंढरपूरला राज्यात पहिल्यांदा किलोवर डाळिंब सौदे बाजार सुरू केले. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे असेही सभापती गायकवाड यांनी स्पष्ट केले.