नंदुरबार : प्रतिनिधी
विधानसभेत ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठलेले कृषिमंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनि मंदिरात जाऊन पूजा केली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नष्ट होवो, असे साकडे घातल्याचे खुद्द माणिकरावांनी सांगितले. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना त्यांनी मात्र याविषयी बोलण्यास नकार दिला.
साडेसातीमुक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील शनि मंदिरात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पूजा आणि आरती केली. या ठिकाणी अनेक नेते दर्शनाला येत असतात.
शनि महाराजांना विनंती केली, की आपल्या सर्वांवरील दुष्काळाचे निवारण होवो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील साडेसाती नष्ट होवो, आपल्या सगळ्यांना अत्यंत चांगले दिवस प्राप्त होवोत, अशी प्रार्थना केल्याचे माणिकराव नंदुरबार येथे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. मुंबईला गेल्यावर ऑनलाईन रमी वादावर सविस्तर बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
















