छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादात शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी उडी घेतली आहे. खैरेंचे राजकारण संपविण्याच्या खेळीला ‘मातोश्री’चा आशीर्वाद असल्याचे आ.
शिरसाट म्हणाले, तर दानवे आणि शिरसाट हे दोस्त असून, शिरसाट हे काहीही बोलतात, अशी टीका खैरे यांनी केली. मुंबईत शनिवारी ‘मातोश्री’वर पदाधिका-यांची बैठक झाली. त्याला खैरे यांना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे दानवे-खैरे वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
खैरेंचे पैसे संपले आहेत. त्या ठिकाणी त्यांना प्रवेश कसा मिळेल? खैरेंनी निष्ठेने काम केले आहे. शिवसेनाप्रमुखांपासून आतापर्यंत जे काही कार्यक्रम होत असते, त्याची जबाबदारी खैरे घ्यायचे. त्यांना ‘मातोश्री’वर प्रवेश मिळत नाही, हे दुर्दैव आहे. खैरेंचे राजकारण संपविण्यासाठी जी खेळी आहे, त्याला ‘मातोश्री’चा आशीर्वाद असल्याशिवाय हे घडणे शक्य नाही.
‘मातोश्री’वर माझी वेगळी बैठक होणार
शिरसाट यांनी केलेल्या दाव्याबाबत खैरे म्हणाले की, मातोश्रीवरील बैठक अंबादास दानवे यांनी आयोजित केलेली होती. त्या बैठकीला मला कशाला बोलवतील. मातोश्रीवर माझी वेगळी बैठक होणार आहे. दानवे आणि शिरसाट दोस्त आहेत. शिरसाट काहीही बोलतात.