मुंबई : प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील पक्ष निरीक्षकांनी आपला अहवाल सादर केला होता. त्यातील १६ मतदारसंघांचा आढावा ठाकरे यांनी घेतला असून, उर्वरित २० मतदारसंघांचा दि. ७ ते ९ जानेवारी असे तीन दिवस आढावा घेणार आहेत, अशी माहिती उद्धवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे.
पक्ष निरीक्षकांनी गटप्रमुख, शाखाप्रमुख यांच्याशी चर्चा करून त्याचा अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. ठाकरे यांनी दि. २६ आणि २७ डिसेंबर या दोन दिवसांत १६ विधानसभा पक्ष निरीक्षक, विभागप्रमुख यांच्यासोबत चर्चा करून शिवसैनिकांचे म्हणणे जाणून घेतले होते. मात्र, काही कारणास्तव पुढील बैठका रद्द करण्यात आल्या होत्या.
त्यामुळे आता २० मतदारसंघांच्या निरीक्षकांसोबत ठाकरे चर्चा करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. निरीक्षकांच्या चर्चेअंती ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख यांच्याशी चर्चा करणार आहेत. यासाठी ‘मातोश्री’वर उपस्थित राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. याचवेळी ठाकरे यांच्या शाखानिहाय भेटीचा कार्यक्रम ठरविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
होणा-या बैठका
७ जानेवारी : घाटकोपर (पश्चिम आणि पूर्व), मानखुर्द, कलिना, अणुशक्तीनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
८ जानेवारी : मुलुंड, विक्रोळी, भांडूप, कुर्ला, धारावी, वडाळा, माहीम
९ जानेवारी : वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा