राज्यात उन्हाळ्याचा कडाका अस झाला आहे. काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला. दरम्यान अंदमान-निकोबार बेटांवरून मान्सूनबाबत खुश खबर आली आहे. यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा १०५ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला असून केरळमध्ये १ जूनला तर मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ८ जूनपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता आहे. एल निनोचा प्रभाव नसल्याने अनुकूल वातावरणामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि अग्नेय बंगालच्या उपसागरात मे महिन्याच्या तिस-या आठवडाअखेर मान्सूनपूर्व वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमी दाबाचा पट्टा लवकर तयार होईल, त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येऊ शकतो. यंदा महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस होईल असा अंदाज आहे. उत्तर गोलार्धात यंदा कमी हिमवृष्टी झाल्याने मान्सूनला पोषक वातावरण आहे. मुंबईत मान्सूनचा पाऊस साधारणपणे जूनच्या दुस-या आठवड्यात सुरू होतो.
यंदा हवामान विभागाने ७ ते ८ जून दरम्यान मुंबईत मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही जास्त पावसामुळे खरीप पिकांना फायदा होईल तसेच धरणे आणि जलाशयांची पाणी साठवणूक वाढेल असा अंदाज आहे. राज्याच्या काही भागात सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. दुपारनंतर जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी आणि केज तालुक्यांत वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीट झाली. परिणामी काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वादळी वारे, अवकाळी पाऊस यासह काही ठिकाणी गारपीट झाली. याचा फटका मोठ्या प्रमाणात केळीच्या बागांना बसला. राज्यात पुढील चार-पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. वादळ आणि अवकाळी पावसामुळे ब-याच ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. आंबा, मोसंबी, डाळिंब या फळबागांसह इतर पिकांना अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसला. शेतशिवारामध्ये तीळ, ज्वारी, भुईमूग, भाजीपाला फुलशेती आहे. यातील तीळ, ज्वारी आणि भुईमूग ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत.
अवकाळी पावसाने या पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पार गेला आहे. विदर्भात ४२ ते ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उष्णतेच्या झळांनी विविध जिल्ह्यांत नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. घराबाहेर पडताना धडकी भरेल एवढे तापमान राज्यभरात नोंदवले जात आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. वाढत्या औद्योगीकरणामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. यातूनच कडाक्याची थंडी, प्रचंड उष्णता वाढताना दिसून येते. गत दोन दशकांच्या तुलनेत यंदा ५ ते ७ अंश सेल्सिअसने तापमान वाढल्याचे दिसून येते. याचा सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होत आहे. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी आता प्रत्येकानेच वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याची वेळ आली आहे. असे केले तरच वाढत्या तापमानाला आळा बसू शकेल आणि सजीव सृष्टीही वाचविणे शक्य होईल.
अमेरिका, चीनसारख्या प्रगत देशांनी औद्योगीकरणात प्रचंड आघाडी मारली आहे. औद्योगीकरणामुळे पर्यावरणाची हानी करणारे कार्बन डाय ऑक्साईडसारखे विषारी वायू वातावरणात सोडले जातात. त्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी झाली आहे. ओझोन वायू नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे. ओझोन वायूचा थर विरळ होत असल्याने तापमानवाढीचे संकट गडद होत चालले आहे. दरवर्षी दोन ते तीन अंश सेल्सिअस तापमानात वाढ होत चालली आहे. भविष्यात असेच होत राहिले तर पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा विनाश होणे अटळ आहे. म्हणून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ची अत्यंत गरज आहे. यंदा फेबु्रवारीपासूनच राज्यात कडक उन्हाळा सुरू झाला. थंडी कमी आणि ऊन जास्त असे वातावरण होते. त्यामुळे सुमारे शंभर वर्षांतील सर्वांत उष्ण फेबु्रवारी महिना ठरला. त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यांनी त्याचीच री ओढली. म्हणून गत अनेक वर्षांतील यंदाचा एप्रिल उष्ण ठरला आहे. मार्चमध्ये कमाल तापमानाचा पारा ४० अंशावर गेला तसेच सरासरी पाऊस कमीच झाला.
एप्रिल महिन्याची सुरुवातही कडक उष्ण झळांनी झाली. म्हणून यंदाचा एप्रिलही खूपच उष्ण ठरतो आहे. हे वातावरण मान्सूनच्या तयारीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक असे आहे. यंदा खूप कडक उन्हाळा आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे. ढगांची निर्मिती वेगाने होते आहे. म्हणजेच मान्सून आपल्या तयारीला लागला आहे असे दिसते. बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असल्याने काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या हालचाली समुद्रातील पाण्याचे तापमान, वा-याची दिशा, हवेचा दाब यावर अवलंबून असतात. सध्या अरबी समुद्रातील तापमान ३१ तर हिंदी महासागराचे तापमान ३० अंश सेल्सिअस इतके आहे. पाणी खूप तापल्याने वेगाने बाष्पीभवन होत आहे. देशातील हवेचा दाब कमी झाला की समुद्राकडून देशाच्या दिशेने वारे वाहू लागतात. अंदमानात त्याची झलक दिसू लागली आहे. तेथे मान्सूनच्या हालचाली लवकर होत असल्याचे जाणवते आहे. त्यामुळे यंदाचा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.