मुंबई : प्रतिनिधी
कॉमेडियन कुणाल कामरा तामिळनाडूत असल्याचे एका फोन कॉलमध्ये त्याने कबूल केले आहे. सध्या त्याचा फोन नंबर लीक झाला असून यावर त्याला धमकीचे कॉल येत आहेत. कुणाल कामराला शोधण्यासाठी, त्याला धमकी देणा-यासाठी त्याने एक पोस्ट लिहून इशारा दिला आहे. सविस्तर पत्र लिहून त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, त्याचा फोन नंबर लीक करून त्याला धमकी देण्याचा प्रयत्न करणा-यांसाठीही त्याने एक खास इशारा दिला आहे. यात तो म्हणतो, जे लोक माझा नंबर लीक करण्यात गुंतले आहेत किंवा मला सारखा कॉल करत आहेत त्यांच्यासाठी : तुम्हाला आतापर्यंत हे लक्षात आले असेल की सर्व अनोळखी कॉल माझ्या व्हॉईसमेलवर जातात, तिथे तुम्हाला तेच गाणे ऐकायला मिळेल जे तुम्हाला आवडत नाही.
मी माफी मागणार नाही. मी जे काही बोललो नेमके तेच अजित पवार (उपमुख्यमंत्री) यांनीही एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हटले होते. मी जमावाला घाबरत नाही आणि मी पलंगावर लपून बसून मामला थंड होण्याची वाट पाहणा-यांपैकीही नाही, असेही कुणाल कामराने म्हटले आहे.
कुणाल कामराला फोनवरून धमकी
कुणाल कामराला धमकी देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्याचा फोन नंबर लीक झाल्याने काही शिंदे समर्थक त्याला फोन करून शिवीगाळ करत आहेत. आज सकाळी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कुणालला धमकी दिली जात असल्याचा एक व्हीडीओ पोस्ट केला आहे.