17.7 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रमारहाण केल्याच्या कृत्याचा कोणताच पश्चाताप नाही

मारहाण केल्याच्या कृत्याचा कोणताच पश्चाताप नाही

बुलडाणा : शिवजयंतीच्या दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी एका युवकावर अमानुषपणे केलेल्या मारहाणीचा व्हीडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. त्यावर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं? हे सांगण्याकरता आज बुलडाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली.. मी त्या युवकाला मारहाण केली, त्या कृत्याचा मला जराही पश्चाताप नाही’ असेही गायकवाड म्हणाले.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, ‘शिवजयंती मिरवणुकीमध्ये काही मुलं नशेमध्ये होती. त्यांनी गांजा ओढला होता. ते मिरवणुकीत वावरत असताना त्यांच्या हातात शस्त्र देखील होते. काही महिलांनी माझ्याकडे या तरुणांबद्दल तक्रार केल्यानंतर मी त्या तरुणांचा पाठलाग करत असताना त्या टोळक्यांनी माझ्या अंगरक्षकावर हल्ला केला. माझ्या अंगरक्षकावर हल्ला करत त्यांना खाली पाडले, हे त्या व्हीडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर परिस्थिती हाताळण्याकरता त्या तरुणांना मी मारहाण केली. कारण, ३० ते ४० हजार लोकांच्या गर्दीमध्ये महिला देखील होत्या. मी त्या युवकाला मारहाण केली, त्या कृत्याचा मला जराही पश्चाताप नाही’ असेही गायकवाड म्हणाले.

‘शिवजयंती आयोजन समितीमध्ये मी अध्यक्ष असल्याने या विश्वासाने त्या महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांची सुरक्षा करणे माझे प्रथम कर्तव्य होते. काही जणांनी मला तिथे प्रशासन असताना आपण कायदा हातात का घेतला? असा सवाल देखील केला’. यावर गायकवाड म्हणाले की, ‘मी पोलिसांची वाट पाहत असतो आणि किंबहुना पोलिस प्रशासन हा प्रकार नियंत्रणात ठेवू शकले असते तर गावामध्ये गांजा आणि अवैध टोळके तयार झाले नसते. त्यामुळे यापुढे देखील अशी परिस्थिती निर्माण झाल्यास मला आधी तिथली सुरक्षा महत्त्वाची आहे’, असेही संजय गायकवाड म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR