लातूर : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील बेलकुंड येथील मारुती महाराज साखर कारखान्याने आर्थिक अडचणीवर मात करीत राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी शेतक-यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत ऊस उत्पादकांना या वर्षी मारुती महाराज साखर कारखान्याने २ हजार ८११ रुपये भाव देऊन ऐन खरीपाच्या पेरणीला बळ दिले आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी असून शेतक-यांनीच आज आशियाना बंगल्यावर मंगळवारी सहकार महर्षी कारखान्याचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख आणि सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले असल्याचे भावोदगार क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजीव कसबे यांनी यावेळी काढले.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कोअर कमिटी सदस्य राजेंद्र मोरे, प्रताप पाटील, राहुल पाटील, गौतम कांबळे, प्रज्योत हुडे, दत्ता किणीकर, मारुती कसबे, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, व्हॉइस चेअरमन सचिन पाटील, अनिल पाटील शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी कसबे म्हणाले की, लातूर सारख्या भागात लोकनेते विलासराव देशमुख यांनी सर्व सामान्य माणसाला जगण्याचे बळ मिळावे म्हणून उद्योगाचे जाळे निर्माण केले असून त्यातूनच औसा येथे बेलकुंड परिसरात मारुती महाराज साखर कारखाना उभारला आहे. त्यातून शेतक-यांची स्वप्न उंचावली. दुर्दैवाने मध्यंतरी कारखाना बंद पडला, त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र आबा मोरे यांनी पुढाकार घेऊन पक्षभेद बाजूला ठेवण्याचे सर्वाना आवाहन करुन सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख आणि माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांना साकडे घातले. त्यावेळी शेतक-यांनी मांजरा परिवारावर अढळ निष्ठा दाखवली व नव्या शिलेदारांच्या खांद्यावर कारखाना सुरु करुन पुन्हा नव्याने गत वैभव प्राप्त करण्याचे शिवधनुष्य दिले, त्यासाठी अतिशय अचूक आणि सूक्ष्मनियोजन दिलीपराव देशमुख यांनी केल्याने पूर्ण कार्यक्षमतेने कारखाना सुरु झाला. म्हणूनच या वर्षी २ हजार ८११ रुपये भाव देताना एफआरपी पेक्षा अधिक रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा झाली आहे.