इगतपुरी : कसारा आणि इगतपुरीदरम्यान घाटात मालगाडीचे ७ डबे घसरले. मधल्या मार्गिकेवर मालगाडीचे डबे घसरल्याने डाऊन लाईनवरील म्हणजेच नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक रखडली. मात्र, मुंबईच्या दिशेने येणा-या वाहतुकीवर याचा परिणाम नाही. लोकल वाहतुकीवरही याचा परिणाम झालेला नाही. कसारा स्थानकातून इगतपुरीच्या दिशेने जात असताना ५०० मीटर अंतरावर मालगाडी रुळावरून घसरली. त्यामुळे नाशिक आणि कल्याण मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली.
मालगाडीचे सात डबे घसरल्याची घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. रेल्वे रुळावरुन मालगाडीचे डब्बे बाजूला करण्याचे काम सुरू आहे. यामुळे अनेक गाड्या उशिरा धावत आहेत. मालगाडीचे डबे रुळावरुन बाजूला काढून मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्यास खूप वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी कल्याण येथून एक्सीडेंट रिलीफ ट्रेन पाठवण्यात आली. तोपर्यंत मुंबईवरून नाशिक दिशेने भारतात विविध ठिकाणी जाणा-या गाड्या थांबवल्या आहेत, तर काही दुस-या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.