सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर स्थानकाजवळ आज मालगाडी रेल्वे रुळावरुन घसरली. या दुर्घटनेत मालगाडीचे जवळपास ५ ते ६ डबे रुळावर अस्ताव्यस्त झाले. धक्कादायक बाब म्हणजे या दुर्घटनेवेळी एखादी रेल्वे समोरून आली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कारण मालगाडीच्या अपघातात आजूबाजूच्या रेल्वे रुळाचेही नुकसान झाले आहे.
भुसावळहून नंदूरबारच्या दिशेला मालगाडी जात होती. या दरम्यान अमळनेर स्थानकाजवळ मालगाडीचे पाच ते सहा डबे रेल्वे रुळावरून खाली घसरले. या अपघातामुळे सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या अपघातात सुदैवाने लोको पायलट आणि गार्ड सुरक्षितपणे बचावले आहेत. संबंधित घटना ही आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वे अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
प्रवासी वाहतुकीला विलंब
या अपघातानंतर वाहतूक सुरळीत होण्यास बराच विलंब झाला. यामुळे प्रवासी रेल्वेलादेखील याचा फटका बसला. सुरत-भुसावळ महामार्गाने दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, या अपघातामुळे या मार्गावरून जाणा-या रेल्वे प्रवाशांचे आज प्रचंड हाल झाले.