23.4 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeमहाराष्ट्रमालवणमध्ये मच्छिमारांनी हाती घेतली मशाल

मालवणमध्ये मच्छिमारांनी हाती घेतली मशाल

मालवण : प्रतिनिधी
तालुक्यामध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मच्छिमारांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याबद्दल नुकताच मालवण तालुक्यातील आचरा, तळाशील, कोळंब या गावात शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक पारंपरिक मच्छिमारांनी उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत मशाल हाती घेतली.

पर्ससीननेट आणि एलईडीद्वारे केल्या जाणा-या अनधिकृत मच्छिमारीविरोधात सुरू असलेल्या पारंपरिक मच्छिमारांच्या लढ्यात आमदार वैभव नाईक हे पारंपरिक मच्छिमारांच्या खंबीरपणे पाठीशी राहिले आहेत. आमदार झाल्यापासून सातत्याने प्रत्येक अधिवेशनात पारंपरिक मच्छिमारांचे प्रश्न ते मांडत आहेत. अवैधरीत्या मासेमारी करणा-या बोटींवर कारवाईसाठी स्वत: समुद्रात उतरून पारंपरिक मच्छिमारांच्या लढ्याला त्यांनी बळ देण्याचे काम केले त्यामुळे मच्छिमार समाजाने देखील आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी रहावे, असे माजी आमदार परशुराम ऊर्फ जी. जी. उपरकर यांनी संगितले.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, पारंपरिक मच्छिमारांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम मी केले आहे. याचबरोबर तौकते वादळातील नुकसानग्रस्तांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना नुकसानीची मालवणात आणून त्यांच्याकडून तब्बल ६५ कोटींचे पॅकेज मिळवून दिले होते.

मतदारसंघात होणार अटीतटीची लढत
कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे अशी अटीतटीची लढत होणार आहे. २०१४ साली नारायण राणे यांना पराभूत करत जायंट किलर ठरलेल्या वैभव नाईक यांनी २०१९ मध्येही या मतदारसंघातून निवडणूक जिंकली. यावेळी मात्र त्यांच्यासमोर निलेश राणे यांच्याकडून कडवे आव्हान दिले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR