कोल्हापूर : प्रतिनिधी
एकीकडे सुरळीत मतदान सुरू असतानाच काही ठिकाणी गालबोट लागलेय. महाराष्ट्रात तीन ठिकाणी शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले आहेत. भिवंडी,कोल्हापूर आणि ठाण्यात दोन्ही शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मालाडमध्ये संजय निरुपम यांनी आक्रमक पवित्रा घेत खुर्ची आणि टेबल फेकले. तर कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांनी दोन्ही शिवसेनेचा वाद सोडवला.
मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. त्यात उमेदवारानेही उडी घेतली. मालाड पूर्व पठाण वाडीत शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. संजय निरुपम यांनी खुर्ची आणि टेबल फेकल्याचे समोर आले आहे. यावेळी निरुपम यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
संजय निरुपम म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे मुस्लिम कार्यकर्ते काही लोकांना जबरदस्तीने उबाठा शिवसेनेला मत देण्यासाठी घेऊन जात होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
कोल्हापूरमध्ये शिवसेनेत राडा, सतेज पाटलांची मध्यस्थी –
कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर कसबा बावडा परिसरात गेले असता कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यास गद्दार हा शब्द वापरल्याने तणाव निर्माण झाला, त्यानंतर जोरदार राडा झाला. सतेज पाटील यांनी जमलेल्या जमावाला पांगवले.
कल्याण पश्चिममध्येही वातावरण तापले
कल्याण पश्चिम विधानसभेत मतदानाच्या दिवशी राजकीय वातावरण तापले. कल्याण पश्चिम विधानसभेतील आधारवाडी परिसरात पोलिंग बूथ लावण्यावरून शिंदे -ठाकरे गटात वाद झाला. कल्याण पश्चिम पुण्योदय पार्क येथे शिवसेना ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या बूथची शिंदे गटाकडून तोडफोड करण्यात आली. ठाकरे गटाचे शाखाप्रमुख यांना देखील मारहाण करण्यात आल्याचा ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाचा आरोप. शिंदे गटाचे माजी नगरसेवक जयवंत भोईर यांनी आरोप फेटाळले. कल्याणमधील खडकपाडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.
समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात राडा
नांदगाव मतदारसंघात समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यावेळी विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांच्या समर्थकाला ‘तुझा मर्डर फिक्स’ अशी धमकी दिली. दुसरीकडे वर्ध्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे सर यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे.
आष्टी विधानसभेत धस समर्थकांना मारहाण
बीडमध्ये परळी विधानसभा मतदारसंघात आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गावात भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महेबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली. यांचे रूपांतर पुढे हाणामारीमध्ये झाले. सुरेश धस समर्थकांना महेबूब शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली.