बीड : प्रतिनिधी
विजयादशमी दस-याचा आजचा दिवस विविध ठिकाणच्या दसरा मेळाव्यांनी गाजत असून सारवगाव येथे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील दसरा मेळाव्यातून धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडेंनी जातीवादावर प्रहार करत भाषण जागवले. त्यानंतर, नारायण गडावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही मराठा समाजाला उद्देशून भाषण केले. तत्पूर्वी नारायण गडावर जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी, त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळल्याचं दिसून आलं. जरांगे पाटील रुग्णालयातून या दसरा मेळाव्यासाठी खास नारायण गडावर आले होते. त्यामुळे, आजारपणातच त्यांनी जोरकसपणे भाषण केले.
विराट संख्येनं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय.. असे म्हणत जरांगे पाटील यांनी नारायण गडावरुन आपल्या भाषणाला सुरुवात केली. मायबापहो… मला बोलायला लई त्रास होतोय, आपला गड नगद आहे म्हणून बोलायला ताकद मिळतेय. जशी मला मिळाली, तशी माझ्या शेतक-याला पण मिळेल. लई वेदना आहेत, शरिराला त्रास आहे. मी ५-६ महिन्यांपूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की, मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी भावनिक भाषण केलं. त्यावेळी, नारायण गडावरील वातावरण भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. तर, जरांगे पाटलांच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू तरळले होते. तरीही, जरांगे पाटील यांनी उपस्थित आणि मराठा समाजाला उद्देशून भाषण केले.
दस-याच्या निमित्ताने सांगतो, जातीला सांभाळायचे असेल तर तुम्हाला शासक बनावं लागेल आणि प्रशासकही बनावंही लागेल. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनापुढे उभं राहावे लागते, तुमच्या पोरांना तहसीलदार, पीएसआय, कलेक्टर बनवा. तुमचे पोरगं-पोरगी तहसीलदार, प्रत्येक क्षेत्रात जर आपले लेकरु गेले ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईल.
सगळे बोगस लोकं जाऊन तिथे बसलेत, बोगस आरक्षण घेतलेले बसलेत बोगस, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरकारी नोकरीत वरिष्ठ पदावर जाण्याचं आवाहन केले आहे. तसेच, मराठा आरक्षण ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कामाला लागा, प्रमाणपत्र काढून घ्या, असेही पाटील यांनी सांगितले.