मुंबई : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी व्यवस्थितपणे तपास करीत आहे. मी राजीनामा का द्यावा, कारण काय? मी कोणत्याही प्रकरणात आरोपी नाही. कोणत्याही घटनेशी माझा अर्थाअर्थी संबंध नाही. हा तपास सीआयडीकडे दिला आहे. न्यायालयातही तपास होणार आहे. त्यामुळे मी मंत्री म्हणून या प्रकरणावर कुठलाही दबाव होऊ शकत नाही, असेही धनंजय मुंडे यांनी सांगत राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, २ जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना वाल्मिक कराड प्रकरण आणि बीड पोलिस स्टेशनबाहेरील पाच खाटांवरून सुरू असलेल्या वादातून त्यांच्यावर होणा-या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. या प्रकरणात दबाव येऊ नये म्हणून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आज माध्यमांशी बोलताना मुंडेंनी आपली भूमिका मांडली.
हत्या करणा-यांची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि दोषीला फासावर लटकवणे माझ्यासाठी आवश्यक असल्याचे मुंडे म्हणाले. या प्रकरणात फास्ट ट्रॅकमध्ये जायला हवं याची मागणी सर्वांत आधी मी नागपूरच्या अधिवेशनात केली होती, असेही ते म्हणाले.
पाच खाटांचे आरोप
वाल्मिक कराड बीड पोलिस स्टेशनमध्ये आहे. दरम्यान बीड पोलिस स्टेशनसाठी पाच खाटा मागविण्यात आल्या आहेत. या खाटा वाल्मिक कराडसाठी मागविण्यात आल्याचा आरोप विजय वड्डेटीवार आणि रोहित पवारांनी केला आहे. मात्र या खाटा पूर्वीच मागवल्याचे धनंजय मुंडेंनी सांगितले. घटनेशी त्याचा संबंध नसल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.