29.5 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रमुंडेंकडून खोटा आदेश!

मुंडेंकडून खोटा आदेश!

मंत्रिमंडळात निर्णय नाहीच, दमानियांकडून महाघोटाळ््याचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी
धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात महाघोटाळा केला असून त्यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झाला नाही, थेट त्याचा आदेश काढून २०० कोटींचा निधी जारी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. जो निर्णयर झालाच नाही, त्याचा खोटा आदेश त्यांनी काढला आणि नंतर अतिरिक्त ५०० कोटींची मागणी केल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढू शकतात.

धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना आपल्या खात्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. मुंडे यांनी मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचे दाखवून त्यांच्या सहीनिशी खोटे आदेश काढले. त्यातून सरकारचा निधी घेतला. त्याचा जीआर काढला, असा आरोप त्यांनी केला. हा मंत्री कुठल्या थराला जाऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि मंत्रिपदावरून हाकलून द्यावे, असे दमानिया म्हणाल्या.

कृषी घोटाळा, देशमुख हत्याकांड या प्रकरणात धनंजय मुंडेंचा किती खोलवर सहभाग आहे, हे दाखवून देणे हाच या मागचा हेतू असल्याचे दमानिया म्हणाल्या. कराड आणि मुंडे कसे एकमेकांसोबत आहेत, ते मी पुराव्यांनिशी सिद्ध केले आहे. कृषी साहित्य कशा प्रकारे चढ्या दरात विकत घेतले, हेदेखील मी दाखवून दिले. इफ्कोची प्रॉडक्ट कशी अनेक वेबसाईटवर विकली जातात, हे समोर आले.

मुंडे भ्रष्ट माणूस
२३ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबरच्या कॅबिनेटचे काही निर्णय झाले. पण यात कृषी विभागाशी संबंधित न झालेल्या निर्णयांबाबत धनंजय मुंडेंनी आदेश काढला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०० कोटींच्या निधीचा कुठेही उल्लेख नसताना ती रक्कम अदा करण्याचे निर्देश धनंजय मुंडेंनी पत्रातून दिले. याशिवाय ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त ५०० कोटींचा निधी देण्याची मागणी केली. मुंडेंसारखा भ्रष्ट माणूस कुठलाच मंत्री होण्याच्या लायक नाही, असा घणाघात अंजली दमानिया यांनी केला.

आता पुरावे घेऊन
समोर येण्याचे आव्हान
आपण केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे हे उडवाउडवीची उत्तरे देतात. यापुढे आरोपांना उत्तरे द्यायची तर पुरावे घेऊन माध्यमांसमोर या, असे आव्हान अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना दिले.

लिमिट ओलांडले
की, निर्णय होतो
एकीकडे विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक झालेले असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना कुठल्याही गोष्टीला लिमिट आहे, लिमिट ओलांडले की ते आपोआप होते. यावर अजितदादा, शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बसून निर्णय घेतील, असे म्हटले.

करुणा शर्मा सुळेंच्या भेटीला
मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच करुणा शर्मा यांनी आपली कैफीयत सुप्रिया सुळेंकडे मांडली. बीडमधील हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने सुळेंनी बीडला भेट दिली. त्यातच आज करुणा शर्मा यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी सुळे यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली. त्यामुळे मुंडेंना आता चौफेर घेरले जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR