बीड : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या आणखी एका व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत. राजेंद्र घनवट असे या व्यक्तीचे नाव असून त्याने पुण्यातील ग्रामीण भागातील लोकांना धमकावून, त्यांचा छळ करून त्यांच्या जमिनी हडप केल्याचा आरोप दमानियांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आणखी एका प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. राजेंद्र घनवट नावाच्या धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाने अनेकांचा छळ करून त्यांच्या करोडोंच्या जमिनी लाटल्याचा आरोप दमानियांकडून करण्यात आला आहे. ज्यामुळे आता एका नव्या प्रकरणाला वाचा फुटली असून दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचे पुरावे सुद्धा प्रसार माध्यमांसमोर दाखवले आहेत.
अंजली दमानिया यांनी मंगळवारी (१ एप्रिल) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून दमानिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, सोबतच त्यांनी काही पुरावे दाखवत मुंडे यांच्या निकटवर्तीय असलेल्या राजेंद्र घनवट याने ज्या लोकांचा छळ करून जमिनी हडप केल्या, त्यांनाही पत्रकार परिषदेत बोलावून या प्रकरणाचा भांडाफोड केला. पत्रकार परिषदेत माहिती देत दमानियांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडे हे माझ्याकडे पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित काही फाईल्सचा गठ्ठा घेऊन आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत तेजस ठक्कर आणि राजेंद्र घनवट नावाच्या व्यक्ती आलेल्या होत्या. त्यावेळी मी त्या राजेंद्र घनवट नावाच्या व्यक्तीला फारसे महत्त्व दिले नाही. मात्र, आता याच व्यक्तीने लोकांना छळून त्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत.
राजेंद्र घनवट कोण आहे? याची माहिती देताना अंजली दमानिया यांनी घनवट आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा एक फोटो दाखवला. धनंजय मुंडे यांच्याबरोबर जवळ असलेले राजेंद्र घनवट आहेत. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी संदर्भात मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना भेटले आहे. यात दोन संचालक आहेत त्यातील एक राजेंद्र घनवट आणि पोपटराव घनवट. या दोघांनी ११ शेतक-यांना छळून त्रास दिला असल्याचा आरोप दमानिया यांनी केला.
तसेच, जे जे शेतकरी यांच्या विरोधात लढायचे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. संजय चव्हाण यांच्या नावावर पॉवर ऑफ अॅटर्नी घेतले जातात, त्याचा चुकीचा वापर केला जातो. बी फॉर्म घेतला जातो. २००४ पासून हे सर्व काही सुरू आहे. मयत व्यक्तीला जिवंत दाखवले जाते, जिवंत लोकांना मयत दाखवले जाते आणि हा व्यवहार केला गेला आहे. यांच्यामागे थेट धनंजय मुंडेंसारखे राजकारणी आहेत. राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांचे पार्टनर आहेत असा आरोपच दमानियांनी केला. या सगळ्या प्रकरणाचे पुरावे मी चंद्रशेखर बावनकुळेंना देणार आहे. यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी अंजली दमानियांकडून सांगण्यात आले.