24.2 C
Latur
Monday, March 3, 2025
Homeमहाराष्ट्रमुंडेंनी स्वत: होऊन तुरुंगात जावे

मुंडेंनी स्वत: होऊन तुरुंगात जावे

फोटो पाहून काळीज हेलावून गेले, जरांगे पाटील यांचा संताप
बीड : प्रतिनिधी
संतोष अण्णाला कपडे काढून मारले, त्याचे फोटो पाहून काळीज हेलावून जात आहे, एवढे क्रौर्य करण्याचे धाडस कसे झाले? आता तरी अजित पवारांनी आणि फडणवीसांनी धनंजय मुंडेंना लाथ मारून बाहेर काढावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. धनंजय मुंडे यांनी स्वत:हून आमदारकीसह सगळ््याच पदांचा राजीनामा द्यावा, स्वत:हून जेलमध्ये जावे अशी संतापजनक प्रतिक्रिया त्यांनी दिली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडे यांच्यावर जर भगवानबाबांचे संस्कार असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार असतील तर मनाने आमदारकीसह सर्व पदांचा राजीनामा द्यावा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपाशी जाऊन राजीनामा दे. तू स्वत:हून जेलमध्ये जा. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंना लाथ मारून बाहेर काढावे, असे जर केले नाही तर थू तुमच्या जिंदगीवर. किती क्रूरपणे एखाद्याला मारले, हे समोर आले. देशमुखांच्या पत्नीला, मुलांना, कुटुंबीयांना काय वाटत असेल. असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हा तर नीचपणाचा कळस
यापुढे आपला मोर्चा हा धनंजय मुंडेच्या टोळीकडे असणार आहे. संतोष देशमुखांना मारताना यांनी निचपणाचा कळस केला. अजित पवारांचे नाव या आधी आपण कधी घेतले नाही. पण आता पहिल्यांदा सांगतो. मुंडेला बाहेर काढले नाही तर तुम्हाला भोगावे लागणार आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

महाराष्ट्र हादरला
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला. या हत्येच्या घटनेने महाराष्ट्राचे समाजकारण, राजकारण ढवळून निघाले. या प्रकरणी आरोपपत्रदेखील दाखल झाले आणि आता आरोपींच्या क्रौर्याचा सर्वात मोठा पुरावा समोर आला. संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो वृत्त वाहिन्यांवर पाहायला मिळाले. यातून माणसाच्या रुपातला हैवान कॅमे-याने कैद केला आहे. हे फोटो पाहून हा आपलाच महाराष्ट्र आहे ना असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR