बीड : प्रतिनिधी
बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहाचा समारोप झाला. या आध्यात्मिक व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस एकत्र आले. त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या भगवानगडाशी संबंधित आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव मोठे करण्याची माझी ऐपत नाही. परंतु हे नाव लहान होऊ देणार नाही. जीवनात कोणाला दुखावणार नाही. इतकेच मागणे मी भगवान बाबांकडे करते, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पाच वर्षे सत्तेत नसताना गडाच्या विकासासाठी सहकार्य केले. मी पालकमंत्री होते तेव्हासुद्धा मदत केली. गडासाठी मदत करावी म्हणजे काय? गडावर येणा-या भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यांना कोणताही त्रास होऊ नये, ही काळजी घेतली पाहिजे. २००६ मध्ये काही कामांमुळे साहेबांना गडावर येता आले नाही. त्यांनी त्यावेळी मला पाठवले. मी भगवान गडावर पहिल्यांदा २००६ मध्ये येऊन भाषण केले होते. त्यानंतर मी भगवान गडावर नेहमी येत राहिले.
नारळी सप्ताहाची थोर परंपरा आहे. येथून सर्व वारकरी संप्रदायाचा जन्म होतो. वामनभाऊंचा आदरयुक्त धाक आहे. भगवानबाबांच्या जीवनात सर्व वैभव आणि संपत्ती होती. त्यानंतर त्यांनी सर्व सुखाचा त्याग करून ईश्वराच्या मार्गाने जाण्याची वैभवशाली परंपरा सुरू केली. ज्याच्या कर्मात वैभव आहे, तोच जीवनात पुढे जाऊ शकतो, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.