मुंबई : प्रतिनिधी
मुंबईकरांना आता रिक्षा, टॅक्सीच्या प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. वाढलेले इंधनदर आणि गाड्यांचा देखभाल खर्च वाढल्याने मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने ऑटो रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी दिली. येत्या १ सप्टेंबरपासून ही नवी भाडेवाढ संपूर्ण एमएमआर क्षेत्रात लागू होणार आहे. रिक्षाच्या मूळ भाड्यात १ रुपयाची वाढ झाली असून, किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये झाले आहे. टॅक्सीच्या भाड्यात २ रुपयांची थेट वाढ करण्यात आली असून, आता किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये होणार आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या भाडेवाढीनंतर आता वर्षभरातच पुन्हा दर वाढवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे इंधन आणि सीएनजीच्या किमतीत सतत वाढ झाली आहे. मे महिन्यात सीएनजीचे दर ८६ रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने रिक्षा-टॅक्सी युनियनने आंदोलनाची भूमिका घेत भाडेवाढीची जोरदार मागणी केली होती.
आरटीओकडून लवकरच या संदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. या निर्णयामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना दिलासा मिळाला असला, तरी रोज प्रवास करणा-या सर्वसामान्यांना मात्र याचा फटका बसणार आहे.















