मुंबई : प्रतिनिधी
मुंबईचे मराठीपण कोणीच घालवू शकत नाही. मुंबईची संस्कृती आणि तिची वाटचाल कायम राहील, त्यात कोणतीच तडजोड होणार नाही. आमच्या पक्षाचा नेता म्हणून अधिकृतपणे सांगतो की, मुंबईचा महापौर महायुतीचा होईल. मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठीच होईल, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदाबाबतच्या चर्चांवर पूर्णविराम लावला, तर हिंदुत्व आणि मराठी हे वेगळे होऊ शकत नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका खासगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील विकासकामे, मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मराठी-अमराठी वादंगासह ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले. मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी, यावरून तापलेल्या राजकारणात भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने भर घातली. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, एक तर कृपाशंकर सिंह हे मीरा-भाईंदरमध्ये बोलले, मुंबईत नाही. दुसरे म्हणजे, कृपाशंकर सिंह हे आमचे अधिकृत प्रवक्ते नाहीत. शिवाय, मीरा-भाईंदरमधले त्यांचे विधान माध्यमांनी मुंबईतले म्हणून दाखविले गेले. मात्र, आमच्या पक्षाचा नेता म्हणून मी अधिकृतपणे सांगतो की, मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठीच होईल.
मराठी संस्कृती टिकवायचीय
मुंबईत पूर्वी बाहेरून मजूर यायचे, आता या शहरात वेगवेगळे लोक येतात. पण मुंबईचे मुंबईपण कुणीही घालवू शकत नाही. मुंबईच्या गणेशोत्सवात पारंपरिक मराठी पद्धतीनेच उत्सव साजरा होतो. त्यामुळे मुंबईची संस्कृती ही टिकवायची आहेच. मुंबईची संस्कृती आणि तिची वाटचाल इकडे-तिकडे जाऊ देणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठी व्होट बँक दुस-यांची आहे, भाजपची नाही हे समजूच नका. मराठी व्होट बँक आमची आहे, हे लक्षात ठेवा.
भाजपाच क्रमांक १ चा पक्ष
जर मराठी माणसांनी भाजपला मतं दिली नसती तर सलग तीन निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडून आले नसते. कुणी काहीही दावा केला तरीही भाजपाच क्रमांक १ चा पक्ष आहे. मराठी, अमराठी सगळेच आमचे मतदार आहेत. मुंबईचं मराठीपण कुणीही घालवू शकत नाही. कुणीही कुठूनही आले तरीही मराठीपण कायम राहणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

