21.5 C
Latur
Thursday, August 28, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा

मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा

शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही : मनोज जरांगे

वडीगोद्री : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारच्या लढाईचा नारा दिला आहे. मुंबईकडे कूच करण्यापूर्वी त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला.
मुंबईत शांततेत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं जाहीर करताना, त्यांनी सर्वांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं. सकाळी साडेदहा वाजता जरांगे यांच्यासह शेकडो गाड्यातून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

जरांगे म्हणाले की, ही आपली शेवटची लढाई आहे. आता आरपारची लढाई करायची आहे. आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न केला जाईल, पण कोणत्याही परिस्थितीत संयम ढळू द्यायचा नाही. डोक्याने ही लढाई जिंकायची आहे. कितीही दिवस लागले तरी लढा सुरूच ठेवायचा आहे. मराठा समाजाची मान खाली जाईल असं कुणीही वागू नये.

हिंदूंचीच अडवणूक का?
जरांगेंनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, आम्ही पिढ्यानपिढ्या हिंदू देवतांची पूजा करतो, तरीही सणासुदीच्या काळात आमचीच अडवणूक का? अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी हिंदू विरोधी म्हणून कोण काम करतं याचं उत्तर द्यावं.

फडणवीसांना त्यांची चूक झाकायची
जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, देव-देवतांच्या नावाखाली आम्हाला त्रास दिला जात आहे. फडणवीसांना त्यांची चूक झाकण्यासाठी देव-देवतांना पुढे केलं जात आहे. इंग्रजांच्या काळातही उपोषणं रोखली गेली नाहीत, पण हे सरकार तेच करत आहे.

आत्महत्या करू नका
लातूर येथील तरुणाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल बोलताना जरांगेंनी भावनिक आवाहन केले ते म्हणाले, अशाप्रकारे आत्महत्या करू नका. तुमच्यासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागे हटणार नाही. तुमच्या शेकडो आत्महत्या या सरकारमुळे झाल्या आहेत. त्यामुळे आत्महत्या करू नका. आता शांततेचे आंदोलन कुणीही रोखू शकत नाही. एकही दगडफेक किंवा जाळपोळ करायची नाही. ही लढाई जिंकली नाही, तोपर्यंत सावध राहा असे जरांगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR