22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईजवळ बोट बुडाली, १३ जणांना जलसमाधी

मुंबईजवळ बोट बुडाली, १३ जणांना जलसमाधी

नौदलाच्या स्पीड बोटीची टक्कर, नीलकमल बोट उलटली,
नौदलाचे बचावकार्य, ११० जणांचे प्राण वाचविण्यात यश

मुंबई : प्रतिनिधी
गेट वे ऑफ इंडियातून एलिफंटाकडे जाणा-या नीलकमल बोटीला नौदलाच्या वेगवान स्पीड बोटीची धडक बसली. यामुळे प्रवाशांची बोट उलटली. यामुळे समुद्रात बुडून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना तात्काळ नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, बोट दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. यावेळी तब्बल ११० प्रवाशांना वाचविण्यात यश आले. त्यातच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियातून एलिफंटाकडे जाणा-या प्रवाशी नीलकमल बोटीला नौदलाच्या वेगवान स्पीड बोटीची धडक बसली. अपघातावेळी बोटीत शंभरहून अधिक प्रवासी आणि ५ बोटीचे सदस्य होते. समुद्रात आजूबाजूला असलेल्या इतर बोटींनी मदतीसाठी वेळीच धाव घेतली. त्यामुळे ११० प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. रात्र झाल्यामुळे शोधकार्यामध्ये अडचण येत असल्याने या घटनेत अजून किती लोक बेपत्ता आहेत किंवा आणखी कुणाचा जीव गेला आहे का, याची माहिती गुरुवारी सकाळी समोर येणार आहे. या बोट धडकेनंतर बोट बुडत असताना प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडत होते. त्यावेळी त्यांच्या मदतीला दोन सीआयएसफ जवानांची शेरा १ पेट्रोलिंग बोट मदतीसाठी धावली.

बोट दुर्घटनेत १३ जणांना जलसमाधी मिळाली असली तरी ही आकडेवारी अंतिम नाही. यामध्ये अद्याप कुणी बेपत्ता असेल किंवा मृत असेल त्याची माहिती गुरुवारी सकाळपर्यंत मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिस आणि नौदलाकडून करण्यात येणार आहे. ज्या १३ जणांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नव्या बोटीच्या इंजिनच्या
टेस्टिंगदरम्यान टक्कर
नेव्हीच्या ज्या बोटीने नीलकमल या बोटीला धडक दिली, त्या बोटीच्या नवीन इंजिनचे टेस्टिंग सुरू होते. त्यामुळे ही बोट समुद्रात आठ या आकारात फिरत होती. त्याचवेळी एक राऊंड मारून आलेल्या या बोटीने समोरून नीलकमल या बोटीला धडक मारली. नवीन इंजिनमध्ये काही तरी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर या बोटीवरचे नियंत्रण सुटले आणि तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिल्याची माहिती नौदलाने दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR