35.1 C
Latur
Monday, April 14, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईतील पाण्याचा प्रश्न लवकर सोडवा

मुंबईतील पाण्याचा प्रश्न लवकर सोडवा

ठाकरे आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने घट होत असल्याने, मुंबईत पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत टँकरचालकांनी संप पुकारला आहे. यामुळे मुंबईत पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील पाण्याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत? ते स्पष्ट करा आणि पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा, अन्यथा पालिकेच्या कार्यालयावर शिवसेना धडक मोर्चा काढेल, असा इशारा आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिला.

महायुती सरकारकडे पैसे नाहीत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुकट योजना आणल्या आहेत. कामगारांच्या पगाराचा निधी दुसरीकडे वर्ग केला जात आहे. एसटी कर्मचा-यांचा पगार रखडवला. त्याप्रमाणे भविष्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचा-यांचे पगार रखडतील, अशी धोकादायक स्थिती निर्माण झाली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो, अशीच परिस्थिती मुंबईत आहे. मुंबईतील चाळ, सोसायटी, बिल्डिंग, रस्त्याची कामे, मॉल्स तसेच पायाभूत सुविधांची कामे यात जी पाण्याची तूट असते, ती भरून काढण्यासाठी वॉटर-टँकर असोसिएशन मुंबईत पाणीपुरवठा करते. पण टँकर असोसिएशनने आधीच संप पुकारला आहे. परिणामी मुंबईत पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

परिस्थितीला ‘एसंशिं’ जबाबदार
एसटी कर्मचारी हे जनसेवा करतात. पण त्यांचे पगार वेळेत होत नसल्याने कर्मचा-यांमध्ये सरकारच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. एसटी कर्मचा-यांनी जर संपाची हाक दिली तर उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाणा-यांचे मोठे हाल होतील, याबाबत सरकारने विचार केला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR