मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ घडलेल्या बोट दुर्घटनेमुळे १३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन जण नौदलाचे कर्मचारी तर १० जण पर्यटक आहेत. नौदलाच्या बोटीने नीलकमल या बोटीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. दरम्यान या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येणार आहे.
नौदलाच्या बोटीला नवीन इंजीन लावले होते. त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होते. त्या चाचणीच्या वेळी इंजीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बोटीवरील चालकाचा ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू
नीलकमल आणि नौदलाची स्पीड बोट यांच्यातील अपघातात १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या १३ लोकांमध्ये १० नागरिक आहेत. तीन नौदलाचे कर्मचारी आहेत. दोन व्यक्ती गंभीर जखमी आहेत. त्यांना नौदलाच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. ११ नौदलाच्या स्पीड बोट आणि ४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सर्वांना वाचवण्यात आले आहे. आज संध्याकाळी ७.३० पर्यंत ही माहिती मिळाली आहे. अधिक माहिती गुरुवारी सकाळी मिळेल. कोणी मिसिंग असेल तर उद्या सकाळपर्यंत कळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.