मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विधानसभा निडवणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून एका मागे एक धक्के बसत आहेत.
आता शिवसेनेच्या (ठाकरे) गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदे गटाने आणखी एक मोठे खिंडार पाडल्याचे पाहायला मिळत आहे.
संजना घाडी या मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या एक महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. त्या माजी नगरसेविका देखील राहिलेल्या आहेत. त्या शिवसेनेच्या उपनेत्या असून काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत संजना घाडी यांचे नाव नव्हते, त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अगदी शेवटच्या क्षणी संजना घाडी यांचं नाव प्रवक्तेपदी जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे देखील संजना घाडी या नाराज असल्याचं बोललं जात होतं.
आज त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर त्यांचे पती माजी नगरसेवक संजय घाडी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजना घाडी यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. संजना घाडी यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.