22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत पुन्हा मराठीची गळचेपी

मुंबईत पुन्हा मराठीची गळचेपी

नोकरी फक्त परप्रांतीयांसाठी; कंपनीची जाहिरात; मनसे-उबाठा आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी
मागील काही काळात मुंबईत मराठी माणसांची गळचेपी होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले. मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे, नोकरीत प्राधान्य न देणे याच्या बातम्या झळकल्या. अनेकदा आंदोलने झाली, मात्र तरीही पुन्हा तसेच प्रकार घडत असल्याचे पुढे आले आहे. मुंबईतील अंधेरी परिसरातील मरोळ इथल्या ‘आर्या गोल्ड’च्या जाहिरातीत नॉन महाराष्ट्रीयन असा उल्लेख करत मराठी माणसाला डावलण्याचा प्रयत्न केला आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक मोठ्या कंपन्या, उद्योग आहेत. मात्र मुंबईत मराठी माणसांना नोकरीत स्थान नाही हे या जाहिरातीतून अधोरेखित होत आहे. एका साईटवर मरोळच्या ‘आर्या गोल्ड’ नावाच्या कंपनीने मॅनेजर पदासाठी जाहिरात दिली होती. या जाहिरातीत फक्त पुरुष उमेदवार आणि कंसात ‘नॉन महाराष्ट्रीयन’ असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र ही चूक लक्षात येताच कंपनीने जाहिरातीमधून हा उल्लेख काढला. पण या प्रकारामुळे मुंबईत पुन्हा मराठी माणसांची गळचेपी होतेय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या जाहिरातीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात राहून यांची इतकी हिंमत कशी होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या जाहिरातीवर संताप व्यक्त केला आहे.

शासनाने सवलती रद्द कराव्यात : मनसे
या कंपन्यांची हिंमत का वाढली, अशा जाहिराती देत असतील तर शासनाने या कंपन्यांना ज्या जागा, सवलती दिल्या आहेत त्या त्वरित रद्द केल्या पाहिजेत. जर सरकारला कारवाई करता येत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने ही कारवाई करेल, त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या कंपनीची आणि प्रशासनाची असेल असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. त्याशिवाय महाराष्ट्राची वीज, पाणी, सुखसुविधा वापरणार आणि मराठी माणसांना नोकरी नाकारणार त्यापेक्षा हे उद्योग बाहेर गेलेले बरे, सरकार म्हणून कारवाई होणे गरजेचे आहे जेणेकरून या लोकांना जरब बसेल असे देशपांडे यांनी म्हटले.

ताबडतोब कारवाई केली जाईल : नरेश म्हस्के
दरम्यान, अशाप्रकारची हिंमत जर कुणी महाराष्ट्रात करत असेल तर त्यांना ठोकून काढले पाहिजे, २ कानाखाली मारल्या पाहिजेत त्याशिवाय अशी प्रवृत्ती बंद होणार नाही. महाराष्ट्रात राहून असे धाडस कुणी करत असेल तर त्यांना प्रसाद देणे गरजेचे आहे. खासदार बेकायदेशीर गोष्टी सांगतोय असे तुम्ही म्हणाल, मात्र ही हिंमत कुणामध्ये होता कामा नये. सरकारकडून या प्रकारावर ताबडतोब कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

सुषमा अंधारे भडकल्या
ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जमीन, वाहतूक, वीज, कच्चा माल, या सगळ्या गोष्टी मुंबई आणि महाराष्ट्रातील चालतील. या राज्याच्या जीवावर तुम्ही मोठे होणार. परंतु, महाराष्ट्रातला मराठी माणूस यांना चालणार नाही. आर्या गोल्ड कंपनीच्या जाहिरातीत ‘नॉन महाराष्ट्रीयन’ अशी प्रमुख अट घालण्यात आली आहे. महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्रासाठी आहे की गुजराती लोकांसाठी? असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर उपस्थित केला आहे.

व्हायरल पोस्टमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप

ही जाहिराता पाहाता पाहाता संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जाऊ लागला. नेटक-यांनी सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती ट्रोंिलग सुरु केल्यानंतर एचआरवर पोस्ट डिलीट करण्याची वेळ आली आहे. मुंबईतील मराठी लोकांना दुय्यम वागणूक कशामुळे असा सवाल नेटकरी विचारू लागले आहेत.

दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
कंपनी ची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहिती आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. अशी पोस्ट टाकता येते का ते? तपासून पाहायला सांगितल जाईल. आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलं असताना अशा पद्धतीची पोस्ट टाकता येते का याची माहिती मागवली जाईल. अशा कंपन्या महाराष्ट्रात नसल्या तरी चालतील, आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू पण असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.

मालकाने महाराष्ट्राची माफी मागितली
बिगर महाराष्ट्रीयन माणसासाठी ही जागा असल्याचे जाहिरातीत स्पष्टपणे सांगण्यात आले होते. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच मनसे कामगार सेनेच्या पदाधिका-यांनी त्या ठिकाणी दाखल होऊन कंपनीच्या मालकाचा चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा प्रकार कंपनीकडून होत असल्याबाबत राज पार्टी यांनी आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाला मनसे स्टाईलने जाब विचारला. त्यानंतर आर्या गोल्ड कंपनीचे मालक बंटी रुपरेजा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी जनतेची माफी मागितली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR