मुंबई : प्रतिनिधी
भाजप महायुतीला महाराष्ट्रात मोठे बहुमत मिळताच परप्रांतीय व्यापा-यांची भाषा बदलली असून ‘मुंबईत भाजपची सत्ता आली आहे. आता मराठी चालणार नाही. मारवाडीतच बोलायचे’ अशी मुजोरी एका मारवाडी व्यापा-याने मराठी महिलेवर केली. मराठी माणसाचा बालेकिल्ला असलेल्या गिरगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
गिरगाव खेतवाडीत राहणा-या विमल म्हसकर या सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गिरगावातीलच महादेव स्टोअरमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी मातृभाषा मराठीतून दुकानदाराशी संवाद साधायला सुरुवात केली. मात्र मारवाडी दुकानदाराने त्यांना मध्येच अडवत आपल्याला मराठी समजत नसल्याचे सांगत तुम्ही मराठी का बोलता, असा सवाल उद्धटपणे केला. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे.
त्यामुळे तुम्ही मारवाडीतच बोलले पाहिजे, असेही त्याने दटावले. त्यामुळे विमल म्हसकर संतापल्या. त्यांनी दुकानदाराला मराठी बाणा दाखवत जाब विचारला. तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी आला आहात. त्यामुळे तुम्ही मराठीतच बोलले पाहिजे, असेही त्यांनी मारवाडी दुकानदाराला खडसावले. त्याचा व्हीडीओ समोर आला आहे. भाजपचे सरकार आले म्हणजे आता आम्ही मराठीत बोलायचे नाही का?
व्यापा-यावर कारवाई करा
मराठीला कित्येक वर्षांच्या लढ्यानंतर ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाला आहे. यासाठी शिवसेनेकडून प्रदीर्घ पाठपुरावा करण्यात आला. असे असताना अभिजात दर्जानंतरही मराठी माणसाच्या मुंबईतच मराठीची गळचेपी होत असल्याने सर्वच स्तरांतून संताप व्यक्त होत असून संबंधित मुजोर मारवाडी दुकानदाराविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.