पुणे : प्रतिनिधी
भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक आणि सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार उद्या (बुधवार, १९ फेब्रुवारी) रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, इफकोचे कार्यकारी संचालक डॉ. उदय शंकर अवस्थी आणि माजी केंद्रीय मंत्री व या सत्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे होत आहे, असे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी व प्रसिध्दीप्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ, अनुभवी असलेल्या मराठेंनी बँक ऑफ इंडिया येथून नोकरीची सुरुवात केली. त्यानंतर डोंबिवली नागरी सहकारी बँक तसेच जनकल्याण सहकारी बँक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वीरीत्या काम पाहिले.
त्यानंतर युनायटेड वेस्टर्न बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली. इंडियन बँक असोसिएशनसारख्या विविध संस्थांमध्ये त्यांनी कामाचा ठसा उमटवला. सन १९७९ मध्ये सहकार भारतीच्या कामात त्यांनी महाराष्ट्राचे सरचिटणीस पदापासून राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत काम केले आणि आजही मार्गदर्शकाच्या भूमिकेतून करीत आहेत. सन २०२० पासून ते रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदावर कार्यरत असून त्यांची ही दुसरी टर्म आहे.