मुंबई : प्रतिनिधी
महानगर गॅसच्या मुख्य पुरवठा पाईपलाईनला तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईतील सीएनजी पुरवठा सलग दुस-या दिवशीही ठप्प झाला आहे. यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि बसची सेवा कोलमडली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील जवळपास ४० ते ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी सेवा बंद आहेत. ज्यामुळे प्रवासी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तसेच बेस्ट बसमध्येही प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
मुंबईत सीएनजी पुरवठ्यामुळे सध्या परिस्थिती गंभीर बनली आहे. मुंबई शहरातील बहुतांश पंपांवर ‘सीएनजी बंद’ असे बोर्ड लावण्यात आले आहेत. ज्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सध्या अनेक पेट्रोल पंपांवर टेम्पोद्वारे पुरवठा सुरू आहे. मुंबईतील माजगाव येथील सीएनजी पंपावर रात्री १२ वाजल्यापासून खाजगी वाहने आणि टॅक्सींच्या दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. या तुटवड्यामुळे मुंबईतील ४० ते ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी सेवा कोलमडल्या आहेत. परिणामी नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना कामावर व शाळेत जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
ठाणे शहरात देखील गॅसकोंडीचा मोठा फटका बसला आहे. ठाण्यातील अनेक ऑनलाईन सीएनजी पंपांवर पहाटेपासूनच रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी रिक्षांच्या अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत रांगा दिसून येत आहेत. अनेक चालकांना सीएनजी भरण्यासाठी एक ते दोन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या दिवसाची कमाई पूर्णपणे थांबली आहे.
घरगुती गॅस पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही
दरम्यान महानगर गॅस लिमिटेडने घरोघरी होणा-या पीएनजी घरगुती गॅस पुरवठ्यावर कोणताही गंभीर परिणाम होणार नाही असे स्पष्ट केले आहे. मात्र, काही ठिकाणी वडाळा गॅस स्टेशनला होणारा पुरवठाच थांबल्याने घरगुती गॅसवरही थोडा परिणाम झाला होता, जो आता सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

